मुंबई : राज्य सरकारचा मानधनवाढीचा प्रस्ताव अंगणवाडी कृती समितीनं धुडकावून लावलाय. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेला संप कायम ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारनं दीड हजार रुपये मानवाढीचा प्रस्ताव अंगणवाडी सेविकांसमोर ठेवलाय. मात्र कृती समितीनं ५ हजारांवरून ९ हजार ५०० रूपये करण्याची मागणी केलीय. सरकारला बुलेट ट्रेन आणि समृद्धी माहामार्गासाठी पैसा आहे मात्र गरीब वर्गाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोप अंगणवाडी कृती समितीनं केलाय.


महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मानधन वाढीची घोषणा केली. सेविकांचे मानधन ५ हजारांवरून ६ हजार ५००, मदतनीसांना २ हजार ५०० वरून ३ हजार ५०० तर मिनी अंगणवाडी सेविकांना ३ हजार २५० वरून ४ हजार ५०० रुपयांवर करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. तसंच दुप्पट भाऊबीज देण्याचंही सरकारनं मान्य केलंय. मात्र आता कृती समितीनं हा प्रस्तावही धुडकावल्यानं आणखीनच तिढा वाढलाय. 
 
पंकजा मुंडेंनी ठेवलेला मानधन वाढीचा प्रस्ताव अंगणवाडी कृती समितीने फेटाळल्याने संप सुरुच आहे. आता तर शिवसेनेने पाठिंबा दिल्याने राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. २७ तारखेच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.


दरम्यान, मानधनवाढ समितीने तयार केलेला साडेनऊ हजार मानधनाचा प्रस्ताव मान्य करण्याची कृती समितीची मागणी आहे. मानधनवाढ समितीमध्ये शासनाचे अधिकारीही होते. त्यामुळे हा प्रस्ताव अंगणवाडी कृती समितीला मान्य नाही. सरकारला बुलेट ट्रेन आणि समृद्धी महामार्गासाठी पैसा उभा करता येतो, गरीब वर्गासाठी सरकारकडे पैसा नाही, अशी टीका कृती समितीने केलेय.