भिकाऱ्याच्या घरात लाखोंचं घबाड; पोती भरुन चिल्लर आणि...
लखपती भिकारी...
प्रशांत अकुंशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या गोवंडीत एका भिकाऱ्याकडे लाखो रुपयांचं घबाड सापडलं आहे. या भिकाऱ्याकडे दीड लाखांची चिल्लर तर पावणे नऊ लाखांच्या फिक्स डिपॉझिट सापडल्या आहेत. भिकाऱ्याकडे एवढी संपत्ती सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
मुंबईतल्या रस्त्यांवर, रेल्वे स्थानकांबाहेर अनेक भिकारी दिसतात. या भिकाऱ्यांकडे आपण अनेकदा कनवाळू नजरेने पाहात असतो. पण यातले अनेक भिकारी लखपती आहेत असं म्हणावं लागेल. गोवंडीतल्या पिरबीचंद आझाद नावाच्या भिकाऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्याच्या घरचा जेव्हा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा त्याच्या घरात चिल्लरची पोती सापडली. ही चिल्लर दीड लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. शिवाय त्याच्या नावे बँकेत ८ लाख ७७ हजारांच्या फिक्स डिपॉझिटही असल्याचं समोर आलं आहे.
पीरबीचंद आझाद एकटाच राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून घराचा तपास सुरु असताना त्याच्याकडे सिनियर सिटीझन कार्ड, आधार आणि पॅन कार्डही सापडले आहे. पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. त्याचे नातेवाईक सापडले तर ही रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्याचे नातेवाईक सापडले नाहीत तर या लाखो रुपयांचं करायचं काय? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.