मुंबई : राज्यातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकार पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करत आहे. त्यादृष्टींने  सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 


मुंबईतील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट येथे ५० टक्के उपस्थिती, सार्वजनिक कार्यक्रमाना ५० टक्के उपस्थिती असे काही निर्णय याआधीच घेण्यात आले आहेत. 


त्यापाठोपाठ आता राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयांमधील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी लसीकरण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. अकृषी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे तसेच सर्व वसतीगृहेसुद्धा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरु राहणार आहेत. तर, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. काही कारणामुळे विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहू शकले नाही तर त्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी देण्यात यावी. 


महाविद्यालयात कर्मचारी आणि प्राध्यापक यांची ५० टक्के उपस्थित असण्याचे नियोजन करण्यात यावे. हे सर्व नियम खाजगी विद्यापीठ, शिक्षण संस्था आणि स्वायत्त महाविद्यालयांना लागू असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.