केंद्राने मोफत लस देत असल्याचे खोटे सांगितले - नाना पटोले
`देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. (Coronavirus in India) केंद्राने मोफत कोरोना लस (COVID-19 Vaccination) देत असल्याचे खोटे सांगितले.`
मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. (Coronavirus in India) केंद्राने मोफत कोरोना लस (COVID-19 Vaccination) देत असल्याचे खोटे सांगितले. तसेच केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हे लोकशाहीला मारक आहे. न्यायालयाला काही समजत नाही, असे त्यांना वाटते आहे. संविधान न मानणारे हे सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
कोरोनाच्या महामारीत देशाच्या आत्म्याला संपवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. संविधान न मानणारे हे सरकार आहे. मोफत लस देत असल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये खोटे सांगितले आहे. आतापर्यंत मोफत लसीकरण केले, पण काँग्रेसने गाजावाजा केला नाही. काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका करुन किती दिवस राज्य करणार आहात, असे सवाल नाना पटोले यांनी भाजपला केला आहे.
देशात कोरोना विषाणूचा उद्रेक वाढला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची गरज आहे. मात्र, केंद्राकडून पुरेसा लसीचा साठा उपलब्ध करुन देण्यात येत नाही. आता लसीकरणाबाबत राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.
भाजपकडून सेंट्रल व्हिस्टावर 20 हजार कोटी खर्च करण्यात येत आहे. मात्र, कोरोना महामारीत लसीकरणावर मात्र केवळ 35 हजार कोटी खर्च करत आहे. 17 कोटी लस खरंच देशात दिल्या गेल्या आहेत का, अशी शंका नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोना रोखण्यात आणि लसीकरण अपयशावरुन केंद्राने देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, त्यांनी भाजप पक्ष नेतृत्वावर टीका केली. हास्यास्पद जागतिक पातळीवर कोण झालंय ते बघा ? जागतिक पप्पू म्हणतात त्यांना आता. ही राजकारण करण्याची वेळ नाही, असे ते म्हणाले. तसेच आता विषय राहिलाय 'सामना'चा. तो सामना आम्ही दोघे बघून घेवू, असे नाना पटोले म्हणाले.