मुंबई : मुंबईतल्या पवईत लेक होम्स या उचभ्रू सोसायटीत एका कुत्र्याला एयर गननने गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवईच्या लेक होम्स सोसायटीत भटके कुत्रे आहेत. यापैकी ब्राऊनी नावाचा कुत्रा आजारी पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल केलं असता त्याच्या शरीरात एअरगनच्या गोळ्या आढळल्या. सोसायटीतल्याच कुणीतरी कुत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिथल्या रहिवासी श्वेताली मुळीक यांनी केला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वेताली मुळीक यांनी ब्राऊनी नावाच्या कुत्र्याची तब्येत ठिक वाटत नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं. कुत्र्याचा एक्सरे काढण्यात आला. एक्सरेमध्ये कुत्र्याच्या शरीरात दोन एयरगनच्या गोळ्या सापडल्या. कुत्र्याचा शवविच्छेदनाचा अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्याला एयरगनने गोळ्या मारल्या असल्याचा खुलासा करण्यात आला.


भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या, BARK-iNN चालवणाऱ्या श्वेताली यांनी, त्या कुत्र्याला आम्ही प्रेमाने ब्राऊनी म्हणत असल्याचं सांगितलं. तो गेल्या आठ वर्षांपासून आमच्यासोबत राहतो. आमचा प्राणी प्रेमींचा ग्रुप आहे जो अशा भटक्या कुत्र्यांसाठी काम करतो. २५ नोव्हेंबर रोजी ब्राऊनी आजारी वाटला. त्याचं वजन कमी झालं होतं. त्याला जवळच्या पशु वैद्यकीय रुग्णालायत दाखल करण्यात आलं. सुरुवातीच्या इलाजानंतर त्याची तब्येत ठीक झाली. मात्र पुन्हा ५ डिसेंबर रोजी त्याची तब्येत बिघडली. त्याला चालता येत नव्हतं. त्यानंतंर त्याला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी त्याच्या शरीरात गोळ्या आढळून आल्याचं श्वेताली यांनी सांगितलंय. ब्राऊनीचं बुधवारी निधन झालं.


ब्राऊनीच्या मृत्यूनंतर श्वेताली यांनी ब्राऊनीला एयरगनद्वारे मारलं असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची चौकशी करत असून फुटेजद्वारे आरोपीचा शोध सुरु आहे.