शिक्षण विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर, शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर सरकारचं घुमजाव
राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी जारी करण्यात आला होता
मुंबई : महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं (Maharashtra Education Department) राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय जारी केला. पण अवघ्या काही तासांतच या निर्णयाबाबत शिक्षण विभागानं यु टर्न घेतलाय. या निर्णयात काही तांत्रिक त्रुटी असल्याचं कारण देत संकेतस्थळावरून हा निर्णय हटवण्यात आलाय. त्यामुळे शिक्षण खात्यातला सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
आवश्यक त्या दुरुस्ती करून तो पुन्हा जारी करण्यात येईल अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण यानिमित्ताने शिक्षण विभागातील असमन्वय आणि घाई गडबडीत घेतलेले निर्णय यावरून समोर येत असल्याच्या चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगू लागल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि शाळांच्या मदतीने कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी सोमवार, 5 जुलै रोजी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.
मात्र, रात्री उशिरा संकेतस्थळावरून निर्णय हटविण्यात आल्याने त्याच्या अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. दरम्यान शाळा सुरू करण्याआधी स्थानिक पातळीवरील अहवाल मागवून घेण्यात येणार आहे आणि जिल्ह्यातील आढावा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पालकांची आणि मुख्याध्यापकांची संमती आवश्यक असणार आहे, त्यामुळे या तांत्रिक बाबी शासन निर्णयात नमूद करण्यात येतील अशी माहिती मिळत आहे.
या दुरुस्त्यानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून नवीन शासन निर्णय जारी करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण काल रात्री हटविण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती अद्याप शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना नसल्याने गोंधळाचे वातावरण होऊन संभ्रम निर्माण झाला आहे.