मुंबई :  आधार कार्ड नसल्याने धान्य देण्यास नकार देणाऱ्या रेशनिंग दुकानदाराच्या प्रतापामुळे एका महिलेवर आपले मुल जीवे गमावण्याची वेळ आली. ही घटना ताजी असतानाच चुनाभट्टीतील माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रसूती रुग्णालयात प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलेसोबतही असाच प्रकार घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुनाभट्टीतील माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रसूती रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी आली होती. या वेळी केवळ आधार कार्ड नाही, या कारणास्तव रूग्णालय प्रशासनाने नाव नोंदणी करण्यास नकार दिला. हा प्रकार नगरसेविका  सईदा खान यांना समजताच त्यांनी रूग्णालयाला भेट दिली. या वेळी खान यांनी रूग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सईदा खान यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना झाल्या प्रकाराबद्दल खडसावलं. यावेळी डॉक्टर, कर्मचारी हे ओळखपत्र आणि गणवेशात आढळले नाहीत हे विशेष.


दरम्यान, सना अजीज खान ही महिला चार महिन्यांची गर्भवती आहे. वैद्यकीय तपासणीसाठी ती रुग्णालयात गेली असता तिला आधारकार्ड नाही म्हणून तपासलंच नाही असा आरोप सना अजीजने केला आहे. या रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलांना योग्य प्रकारची वागणूक मिळत नाही तसंच वेळेवर उपचारही मिळत नाही. डॉक्टर, कर्मचारी महिलांबरोबर अभद्र भाषेत बोलतात असा आरोप रुग्णांनीही केला आहे.