मुंबई : ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या घातक विषाणूमुळे जगभरात चिंताजनक परिस्थिती आहे. देशात सध्या ओमायक्रॉनचा एकाही रुग्ण नसला तरी खबरदारीची उपाययोजना आखली जात आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या  दैनंदिन रुग्णसंख्येत (Corona Cases in Mumbai) मोठी घट झाल्याचं पाहिला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 24 तासात 108 नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या दीड वर्षात कोरोना रुग्णसंख्येचा हा निचांक आहे. याआधी 16 एप्रिल 2020 रोजी 107 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 


गेल्या चोवीस तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून 215 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहचला आहे. 


मुंबईत शुक्रवारी 230, शनिवारी 214, रविवारी 217, सोमावरी 115 तर मंगळावारी 187 रुग्ण आढळले होते. आज त्यात आणखी घट होऊन 108 रुग्ण आढळले. 


मुंबईत बरं झालेल्या रुग्णांची संख्या आता 7 लाख 42 हजार 176 इतकी झाली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2780 दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत सध्या दोन हजाराहून कमी सक्रीय रुग्ण संख्या आहे. मुंबई सध्या कोरोनाचे 1904 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.