कपिल राऊत - मेघा कुचिक, झी २४ तास, मुंबई : नातेसंबंध बिघडत चाललेत... इतके की आपल्या जवळच्या व्यक्तीची हत्या करण्यापर्यंत मजल जाऊ लागलीय. विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या उपनगरांमध्ये घडलेल्या घटनांमुळे हे जास्त अधोरेखित झालंय.


गेल्या काही दिवसांतल्या या घटना...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- घरगुती वादातून सासूकडून सुनेची हत्या...


- मटण कमी वाढलं म्हणून पत्नीची हत्या...


- जीन्स-टीशर्ट घालणाऱ्या पत्नीवर हल्ला...


- मुलीचे प्रेमसंबंध मान्य नसल्यानं तिची निर्घृण हत्या


गेल्या एक-दोन आठवड्यांमध्ये घडलेल्या या घटना... धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईच्या उपनगरांमध्ये झालेल्या या प्रकारांमुळे एकूणच नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. घरातल्या मुलीकडे, पत्नीकडे किंवा सुनेकडे बघण्याची मानसिकता काय असते? हे दाखवून देणारी ही उदाहरणं आहेत. समाजातली खुनशी पुरुषी मानसिकता यामागे असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे केवळ पुरूषच नव्हे, तर अनेक महिलांनाही स्त्रीस्वातंत्र्य खटकतं... 


यावर, समाजातील सर्वच घटकांचं प्रबोधन करण्याची गरज असल्याचं मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. युसूफ माचिसवाला यांनी व्यक्त केलंय. दुसरीकडे नात्यांमधला जिव्हाळा तुटत चालल्यामुळे अशा घटनांचं प्रमाण वाढल्याचं मत मानसोपचारतज्ज्ञ असीरा चुरमुले यांनी व्यक्त केलंय.



ग्रामीण भागातून अनेक लोक मुंबई आणि परिसरामध्ये स्थायिक होतात. मात्र, इथल्या मेट्रोपोलिटन संस्कृतीशी जुळवून घेत नाहीत. त्यामुळेही अशा घटनांमध्ये वाढ होणं संभवत असल्याचं ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचं म्हणणं आहे.


अशा घरगुती प्रकरणांमध्ये लक्ष घालण्यास पोलिसांनाही मर्यादा आहेत. त्यामुळे नातं ताणेपर्यंत तुटू न देणं, वेळप्रसंगी त्यासाठी मानसोपरतज्ज्ञांची मदत घेणं आणि महत्त्वाचं म्हणजे संयम बाळगणं हेच यावरचं उत्तर आहे.