हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना इशारा; पुन्हा पावसाचा अंदाज
पाऊस आणखी लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
मुंबई : शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाने झोडपलेल्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील ४ ते ५ दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
पाऊस आणखी लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कापलेले पीक सुरक्षित जागी साठा करण्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. अगोदरच पावसाने खरीपांच्या पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळं उरलं-सुरलेलं पीकही हातचं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याच्या सर्वच भागात परतीच्या पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने सोयाबीन, कापूस आणि ज्वारीचं प्रचंड नुकसान झालं आहे. पाऊसने कापसाचे बोंड भिजून गळून पडली आहेत, सोयाबीन पाण्यात गेले, तर ज्वारी काळी पडली. मका भिजल्यानं अंकुरला असून तूर पाण्याने सडली आहे. भात पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे.