मुंबई  : राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली. त्याचवेळी थर्माकोलवरही बंदी लागू करण्यात आली होती. मात्र, या विरोधात काही संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्याबाबद आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची थर्माकोलची बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता राज्यात थर्माकोलचा वापर करता येणार नाही. त्यामुळे सण आणि उत्सवात थर्माकोलच्या वापरावर बंधन येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवानगी देणे शक्य नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने थर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी कायम ठेवली आहे.  तसेच थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनची विनंतीही फेटाळून लावली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, यासंदर्भात सविस्तर आदेश याआधीच दिले आहेत. विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे, त्यामुळे बंदी उठवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केलेय.


गणपती उत्सवासाठी थर्माकोलची घाऊक खरेदी कित्येक महिने आधीच होते आणि राज्य सरकारने मार्चमध्ये बंदी लागू केली. त्यामुळे डेकोरेटर आणि कलाकारांचे मोठे नुकसान होत असल्याने यंदाच्या उत्सवासाठी थर्माकोल वापरण्याची मुभा द्यावी, अशी विनंतीची याचिका थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनने अॅड. मिलिंद परब यांच्यामार्फत न्यायालयात करण्यात आली होती. 


दरम्यान, गणेशोत्सव संपण्याच्या दहा दिवसांच्या आत थर्माकोलचा मखर परत मिळाल्यास पाच टक्के रक्कम परत केली जाईल, असा उपक्रम राबवण्याचा मानस आहे. त्याचबरोबर उत्पादकांनीही प्रदूषण न करता थर्माकोलची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन दिले आहे, असे म्हणणे याचिकादारांनी मांडले होते. मात्र, याविषयी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने सुनावणीअंती याचिका फेटाळून लावली.