मुंबई : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवल्याने पीएचडी करत असलेल्या एका चतुर्थश्रेणी सफाई कामगारालाच देशोधडीला लावण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील यादव या सफाई कामगारांने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्याने आपल्याला बीएमसीने कार्यमुक्त केल्याचा दावा केलाय. सुनील हे नाईट शिफ्टमध्ये कचरा गाडीमध्ये भरण्याचे काम करून दिवसा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण करत आहेत. तसंच ते रिसर्चसाठी दक्षिण आफ्रिकेतही सहा महिने जाऊन आले आहेत. परंतु ते घेत असलेल्या उच्च शिक्षणाचे कौतुक त्याच्या विभागाला मात्र नाही. 


अधिकाधिक मानसिक त्रास या विभागाचे अधिकारी देत असल्याचा त्याचा दावा आहे. बदलीसाठी अर्ज केल्यानंतर सुनील यादव यांना कोणतेही कारण न देता कामावरून मुक्त केल्याचे पत्र त्याच्या हाती बीएमसी प्रशासनाने दिले आहे. यादव हे नेहमीच या विभागातील गैरकारभाराविरोधात आवाज उठवत असतात.


उच्च शिक्षण घेतले तरी त्यांना कचरा उचलण्याचेच काम दिले जाते. हे काम करण्यास यादव यांनी कधी नकार दिला नाही, परंतु येथील अन्यायकारक गोष्टींविरोधात त्यांनी वरपर्यंत तक्रारी केल्या आहेत. ज्यातून त्यांना अशा प्रकारे थेट कार्यमुक्त केल्याचे पत्र देण्यात आलेय. एक चतुर्थश्रेणी कर्मचारी उच्च शिक्षण घेत असताना त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होते आहे.