कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना केंद्राचे कुठलेच नियोजन नाही - थोरात
देशात आणि राज्यात कोरोनाचा (Coronavirus) मोठा प्रादुर्भाव होत असताना केंद्र सरकाचे धोरण निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे.
मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचा (Coronavirus) मोठा प्रादुर्भाव होत असताना केंद्र सरकाचे धोरण निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट घातक आहे. आणि आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु आहे. (corona third wave) केंद्राचे कुठलेही नियोजन नाही आणि कुठलेही धोरण दिसत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज पुन्हा पत्रकार परिषदेत केला आहे.
आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. लसीकरणासाठी केंद्राकडून डोस उपलब्ध केले जात नाहीत. लसीकरणासाठी केंद्राकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. लसीकरणासाठी असणाऱ्या अॅपमध्ये गोंधळ होत आहे. अॅपचे नियोजन राज्याने केले पाहिजे, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्राला विनंती केली आहे की, आम्हाला आमचे अधिकार द्या. आज केंद्र सरकारचे निष्क्रिय धोरण दिसून येत आहे, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
..मग केंद्र सरकार काय करते आहे?
पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट घातक आहे. तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. या सर्वांवर उपाय लसीकरण आहे. मात्र, असे असताना केंद्राचे कुठलेही नियोजन दिसत नाही आणि कुठलेही धोरण नाही. सर्वोच्च न्यायालय टास्क फोर्स नेमण्याचा आदेश देते मग केंद्र सरकार काय करते आहे, असा सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित करत लसीकरणाचे धोरण केंद्राकडे नाही, असा हल्लाबोल केला.
महाराष्ट्र कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करत आहे. कडक निर्बंध सध्या सुरु आहेत. लोक आता जागृत आहेत, काळजी घेतली जातेय. 15 मे नंतर काय याचा आढावा कॅबिनेटमध्ये घेतला जाईल, असे सांगताना लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत.
'मराठा आरक्षणाबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत'
मराठा आरक्षणा बद्दल राज्य सरकार म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. याबद्दल अधिक माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण देतील. पण आरक्षण बद्दल आम्ही सरकार म्हणून काय करता येईल हे पाहत आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती उत्तम आहे. ते आता कोविडमधून बाहेर पडले आहेत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.