मुंबई : काँग्रेसला उपमुख्यमंत्री आणि अध्यक्षपद ही दोन्ही पदे हवी होती. मात्र, राष्ट्रवादीने यातील एकच पद मिळेल, असे स्पष्ट केले. तरीही मागणी काँग्रेसकडून धरुन ठेवण्यात आली होती. आज झालेल्या चर्चेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तिढा सुटला. काँग्रेसला अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद देण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत हे पद कोणाला द्यायचे यावर वाद आहे. आधीच जयंत पाटील यांचे नाव सूचविण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांनी बंड मागे घेत पक्षात परतले. त्यानंतर त्यांच्या समर्थक आमदारांनी त्यांचा पद देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तिढा निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र विकासआघाडीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदावरूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद झाला होता. काँग्रेसने आक्रमक होत उपमुख्यमंत्री आणि अध्यक्षपद ही दोन्ही पदे देण्याची मागणी केली होती. महाविकासआघाडीच्या बैठकीत वाटपाबाबत अध्यक्षपद किंवा उपमुख्यमंत्री यापैकी एकच पद मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसच्या मागणीवर आक्षेप घेतला.



तसेच अजित पवार यांच्या नाट्यानंतर पुन्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते सत्ता वाटपाच्या चर्चेसाठी एकत्र बसले असता विधानसभा अध्यक्षपद हा कळीचा मुद्दा ठरला होता. काँग्रेला अध्यक्षपद देण्यात आले आहे. काँग्रेसने अध्यक्षपद प्रतिष्ठेचे केल्याने शेवटी शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसचा दावा मान्य केला. तो मुद्दा आता सुटला आहे.


विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचे नाव निश्चित झाल्याने ते अर्ज दाखल करतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदावरुन कोणताही वाद नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दुसरीकडे भाजपकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.