उद्यापासून लसीचा दुसरा डोस देणार, जाणून घ्या प्रक्रिया
काही दिवसांत लसीकरण केंद्रांच्या संख्येतही वाढ होणार
मुंबई : उद्यापासून राज्यासह मुंबईत लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागासह मुंबई महापालिकेला कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. येत्या काही दिवसांत लसीकरण केंद्रांच्या संख्येतही वाढ होणार आहे.
या डोसेजच्या माध्यमातून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात येणार आहे. या लसींचा साठा गरजेनुसार लसीकरण केंद्रांवर पोहोचविला जाईल.
१ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होतोय. मुंबई महापालिकेने 16 जानेवारीपासून सुरू केलेल्या लसीकरणाचा पहिला आणि दुसरा टप्पा वेगाने सुरू असून आता खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी मिळणार आहे. याची सुरुवात येत्या सोमवारपासून होणार असून 20 खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईत कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यापासून सर्वसामान्यांचे लसीकरण सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील ज्येष्ठ आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे.