यंदा परतीचा पाऊस लांबणीवर, हवामान खात्याने वर्तवली शक्यता
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.
मुंबई : राज्यभरात समाधानकारक हजेरी लावलेल्या पावसाचा परतीचा प्रवास यंदा लांबण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पण यानंतर ऑगस्ट महिन्यात कमी पावसाची नोंद झाली.
मात्र, आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. त्यामुळे यंदा परतीच्या पावसाला विलंब होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 10 आणि 11 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस वाढण्याची शक्यता असून, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.