पाच वर्षांत देशातील श्रीमंतांची संपत्ती ८७ टक्क्यांनी वाढणार
एका अहवालानुसार, भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत ८७ टक्के इतकी वाढ होणार आहे.
मुंबई : देशातील श्रीमंत लोकांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते आहे. एका अहवालानुसार, भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत ८७ टक्के इतकी वाढ होणार आहे. हा अंदाज आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट आणि वेल्थ एक्सने एका अभ्यासानंतर लावला. या अहवालानुसार देशातील ४ हजार ४७० अतिश्रीमंत लोकांची संपत्ती परदेशातील त्यांच्या समकक्ष व्यक्तींपेक्षा जास्त आहे. अतिश्रीमंत भारतीयांकडे सरासरी ८६५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर हाच आकडा जगात ७८० कोटी इतका आहे.
एकूण संपत्ती इतक्या कोटींची
आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत २ लाख ८४ हजार १४० लोकं श्रीमंत आहेत. या श्रीमंतांची एकूण संपत्ती ही ९५ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. अहवालात अंदाज लावण्यात आला आहे की, २०२१ पर्यंत या श्रीमंतांची संपत्ती १८८ लाख कोटी इतकी होण्याची शक्यता आहे. या आकडेवारीत ८६ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. सोबतच अशा देशातल्या श्रीमंतांच्या संख्येत वाढ होऊन ती ५ लाख २९ हजार ९४० इतकी होईल.
गेल्या ५ वर्षांत ४० टक्के संपत्ती वाढ
आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य अधिकारी करण भगत यांच्यानुसार, गेल्या ५ वर्षांत देशातील श्रीमंतांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली. इतर देशांच्या तुलनेत ही टक्केवारी सर्वाधीक आहे. परदेशात श्रीमंतांच्या संख्येत ३.२ टकक्यांनी वाढ झाली आहे. तर संपत्तीत ४.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
श्रीमंतांच्या यादीत भारतीय
जगभरातील श्रीमंतांच्या यादीत काही नवीन भारतीयांचा समावेश झाला आहे. इकॉनॉमिक टाईम्सनुसार, याबाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. यानंतर जपान आणि चीन या देशांचा क्रमांक लागतो. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे भारतातील श्रीमंत लोक त्यांच्याकडील संपत्ती रोख पैशांच्या स्वरुपात बाळगत नाहीत. मात्र, परदेशात रोख रक्कम बाळगणाऱ्यांचे प्रमाण तुलनेत जास्त आहे. जवळपास ५५ टक्के भारतीय श्रीमंतांना वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीचा लाभ झाला आहे. याची सरासरी ३४ टक्के इतकी आहे. तर ४५ टक्के श्रीमंत भारतीयांनी स्वकमाईवर आपले स्थान निर्माण केले आहे.