मुंबई : लढाऊ संघटना अशी ओळख असलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेत फूट पडली आहे. संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा वेगळा गट आणि विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे यांचा स्वतंत्र गट असे दोन गट आता या संघटनेत तयार झाले आहेत.


राजकीय पक्षावरुन फूट


राजकीय पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडसोबत काम करायला तयार नसलेल्या कार्यकर्त्यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. या गटाच्या अध्यक्षपदी प्रवीण गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाची संभाजी ब्रिगेड ही नोंदणीकृत सामाजिक संघटना आहे. तर मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखालील संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे आपली संघटनाच अधिकृत संभाजी ब्रिगेड संघटना असल्याचा दावा गायकवाड गटानं केला आहे.