राज्य इगोसाठी नव्हे तर जनतेसाठी चालवायचे असते, फडणवीसांचा ठाकरेंना टोला
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरेच्या मुद्द्यावरुन टोला लगावला आहे.
दीपक भातुसे, मुंबई : आरे कारशेडवरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटलं की, 'राज्य इगो, अहंकारासाठी चालवायचे नसते. तर जनतेसाठी चालवायचे असते. आरेच्या जागेला न्यायालयाने, ग्रीन ट्रीब्यूनलने मान्यता दिली होती. तरी देखील जागा बदलण्यात आली.'
फडणवीसांनी म्हटलं की, 'आरेतील कारशेड पहाडी गोरेगावला नेले. पण आरेमध्ये अनेक प्रकारची कामं झाली आहेत. या कामाचे पैसे कोण देणार?. पैसे कुठून वसूल होणार?. मेट्रोचं काम बंद ठेवल्याने दर दिवशी ४ कोटी रुपयांचं नुकसान होतं आहे. सचिवांची समिती तुम्ही नेमली त्यांनीही कारशेड आरेमध्ये व्हावे म्हटले तरी तुम्ही ते पहाडी गोरेगावला हलवले.'
'आरे कारशेडची जागा हलवल्याने यामुळे २०२३ पर्यंत सुरू होणारी मेट्रो २०२६ पर्यंतही सुरू होणार नाही. आरेची. जागा सरकारची होती, पहाडी गोरेगावची जागा खाजगी आहे ती विकत घ्यावी लागेल, खर्च वाढणार आहे. तर मग इतका पैसा कुठून आणणार. राज्यामध्ये आधीच निधीची कमी आहे. त्यामुळे मी विनंती करतो सरकारने फेरविचार करावा आणि मेट्रो कारशेड आरेमध्येच उभारावे.' असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.