मुंबई: ऐन सुट्टीच्या दिवशी समुद्रात उंचच उंच लाटा उसळ्यामुळे पावसाळा एन्जॉय करणारा मुंबईकर भलताच खूश आहे. मुंबईच्या समुद्रात दुपारी एकच्या सुमारास सुमारे ४.९६ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. या लाटांचा आनंद घेण्यासाठी आणि विकेंड साजरा करण्यासाठी हौशी मुंबईकरांनी मरीन लाइन्स, वरळी सी-फेस आणि गेट वे ऑफ इंडिया इथं गर्दी केली. मुंबईत पुढील ४ दिवस धोक्याचे असणार आहेत. या कालावधीत समुद्राला मोठी भरती असून समुद्रात शनिवारी ४.९६ ,रविवारी ४.९७ सोमवार ४.८९ व मंगळवारी ४.७० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. दरम्यान रविवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलाय. 


लाटांसोबत शेकडो टन कचरा किनाऱ्यावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे समुद्राला असं उधाण आलेलं असताना शेकडो टन कचराही मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर जमा झालाय. आपण वर्षभर समुद्रामध्ये कचरा टाकत असतो. हाच कचरा पावसाळ्यात लाटांसोबत समुद्र परत मुंबईकरांना देत असतो. समुद्रात टाकलं जाणारं प्लास्टिक ही तर जागतिक समस्या. सागरी जीवसृष्टीला यामुळे धोका उत्पन्न झालाय. असं असताना आपण समुद्राचं प्रदुषण करणं काही थांबवत नाहीये.. मुंबईच्या किनाऱ्यांवर झालेला हा कचरा म्हणजे आपल्याच कृत्यांचा परिणाम आहे, अशी भावना समुद्राच्या लाटांचा आनंद घेताना पर्यटक व्यक्त करत आहेत.


कोकणच्या समुद्रातही हाय टाईड


कोकणात सध्या समुद्रात हाय टाईड सुरु आहे. समुद्राला आलेल्या भरतीमुळे मालवण तालुक्यात तोंडवळी मधलीवाडी तळाशील किनारा समुद्र गिळंकृत करत आहे. किनारपट्टीवरची सुरुची मोठ मोठी झाडे समुद्रात कोसळतायत. काही ठिकाणी पंचवीस मीटर तर काही ठिकाणी चाळीस मीटर पर्यंत समुद्र आत घुसल्याने वस्तीला धोका निर्माण झाला आहे. संरक्षक बंधारा बांधण्याचं आश्वासन दिलं जातं मात्र ते प्रत्यक्षात उतरत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. तर, दुसरीकडे पर्यटकांची मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय...