मुंबईत मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मंत्रालयात तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सहाव्या मजलावरील सज्जावर तरुण चढल्याने एकच धावपळ उडाली आहे.
मुंबई : मंत्रालयात तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सहाव्या मजलावरील सज्जावर तरुण चढल्याने एकच धावपळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)
मंत्रालयाच्या सज्जावर चढलेल्या या तरुणाने एक चिठ्ठी खाली टाकली आहे. मात्र, त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला, याचे कारण समजू शकलेले नाही. मंत्रालय परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाने मोठा पडदा पसरलाय. तसेच पोलिसांनी त्याला मोबाईल केलाय. तो मोबाईलवर बोलत आहे.
सहाव्या मजल्यावरील सज्जावर चढलेला हा तरुण खाली उडी मारण्याची धमकी देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर हे मला भेट देत नाहीत किंवा माझ्याशी बोलत नाहीत, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा इशारा त्याने दिलाय. या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलीस त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधत आहेत.
मात्र, त्याने उडी मारलीच, तर त्याला झेलण्याची तयारी अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेय. दरम्यान, हा तरुण कोण आहे आणि त्याच्या मागण्या काय आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. परंतु, त्याच्या आत्महत्येच्या धमकीनंतर मंत्रालयाबाहेरही गर्दी झालेय.