`आधार कार्ड` मिळण्यासाठी नाकीनऊ, केंद्रांचा भोंगळ कारभार
सरकारी काम असो वा शैक्षणिक काम. आधार कार्डाशिवाय कोणतंही काम होत नाही. त्यामुळे नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी आणि आधार कार्डात चुकलेली माहिती दुरूस्त करण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
मुंबई : सरकारी काम असो वा शैक्षणिक काम. आधार कार्डाशिवाय कोणतंही काम होत नाही. त्यामुळे नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी आणि आधार कार्डात चुकलेली माहिती दुरूस्त करण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
आधार कार्ड सेंटरबाहेर रांगा
राज्यात सर्वत्रच आधार कार्ड सेंटरची संख्या कमी करण्यात आली असून अत्यंत तुटपुंज्या सेंटरवर लोकांची मरणाची गर्दी पाहायला मिळतंय. तसंच एका आधार कार्ड सेंटरवर केवळ २५ टोकन दिलं जात असल्यानं पहाटे चार वाजल्यापासून आधार कार्ड सेंटरबाहेर रांगा दिसू लागल्या आहेत.
निष्काळजीपणाचा कहर
घाटकोपर पश्चिम येथील एका सेंटरवर सुमारे २००-२५० जण रांगेत उभे असताना आज ऑपरेटरच आले नसल्याने एकही आधार कार्ड निघू शकले नाही, इतका निष्काळजीपणा यातून दिसतो. आलेल्या नागरिकांना ५ मार्च नंतरच्या तारखा दिल्या गेल्या.
अनेकांना हेलपाटे
उन्हातान्हात लहान बाळांना घेवून महिला आधार कार्ड काढण्यासाठी येतायत, परंतु त्यांनाही अनेकदा हेलपाटे खावे लागतात.अनेकजण तर तीनचारवेळा येवून गेलेत तरीही त्यांचे काम झालेले नाही.