मुंबई : भाजपने टाळीसाठी हात पुढे केलाय पण युतीसाठी टाळी मिळणार नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. २०१४ मध्ये युती का तोडली? याचं आधी स्पष्टीकरण द्या असा सवालही संजय राऊत यांनी विचारलाय.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचा स्वबळाचा ठराव बदलायला तो काय बेडकाचा डराव आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. वाघाला गोंजारण्याची वेळ आता निघून गेलीय असं सांगत भाजपशी वेळ निघून गेल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकीयातून दिलेत.


भाजपच्या स्थापना दिनाच्या मेळाव्याची चिरफाड सामनाच्या संपादकीयातून करण्यात आली. पाहूयात सामनाच्या संपादकीयमध्ये काय म्हटलयं.


२०१४ साली मोदींच्या महापुरात साप, मुंगूस, कुत्री, मांजरी वाहून गेली. तसे २०१८च्या भाजप स्थापनेच्या मेळाव्यात राष्ट्रीय विचार वाहून गेले. २०१९ चे चित्र पूर्णपणे वेगळे असेल. पण भाजप अजूनही २०१४ च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे.


भाजपला मित्रांची गरज नाही. ते मजबूत आणि स्वयंभू आहेत. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. हा सद्विचार त्यांना २०१४ साली सुचला नाही आणि सत्ता मिळाल्यावर ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही.


काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आरोप केला की, या मेळाव्यावर किमान पन्नास कोटींची उधळपट्टी झाली (चव्हाण, जपून बोला. नाहीतर भुजबळांच्या बाजूच्या रिकाम्या कोठडीत बसावे लागेल) महाराष्ट्राची आर्थिक घडी बिघडली असताना एखाद्या मेळाव्यावर इतका खर्च झाला असेल तर ते बरे नव्हे.


६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना झाली. तेव्हा गोधडीत असलेले अनेकजण कालच्या मेळाव्यात व्यासपीठावर स्थानापन्न होते. मात्र, ज्यांनी भाजपची स्थापना केली आणि ज्यांच्या कष्टामुळे भाजप वाढला ते लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि इतर नेते 'ह्यात'असूनही व्यासपीठावर सोडा निमंत्रितांमध्येही दिसले नाहीत.


युपीए सरकारच्या काळातही यातली काही साप, कुत्री, मांजरी काँग्रेसबरोबर होती आणि मोदी लाट दिसताच यापैकी काही प्राणी भाजपच्या तंबूत शिरले. त्यापैकी एक तेलगू देसम नुकताच बाहेर पडला आहे. शिवसेनेचा वाघ हा पिंजऱ्यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या आणि राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही.


राष्ट्रीय अध्यक्षांकडून कश्मीरातील न थांबणारा हिंसाचार, दलितांचा हिंसाचार यावर परखड मतप्रदर्शनाची अपेक्षा होती. पण त्यावरही काहीच भाष्य झालं नाही.



युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत