मुंबई: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याच्या वृत्ताचे शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून खंडन करण्यात आले. राज्य सरकारचा असा कोणताही इरादा नसून या केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले की, असा कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीचअंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. 



दरम्यान, राज्यात गुरुवारी कोरोनामुळे १५२ जणांचा मृत्यू झाला. तर नव्या कोरोना रुग्णांची संख्या ३,६०७ ने वाढली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. एकट्या मुंबईमध्येच कोरोनामुळे गुरुवारी एका दिवसात ९७ जणांचा मृत्यू झाला, तर १,४१८ नव्या रुग्णांची भर पडली. राज्यामध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे ३,५९० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९७,६४८ एवढी आहे. तर राज्यात एकूण ४७,९६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत ४६,०७८ रुग्णांना घरी सोडून देण्यात आले आहे.