...अशी झाली कोरोना पॉझिटीव्ह महिलांची प्रसूती
गरोदर महिलांना भेडसावणारी भीती...
सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असण्याचा वसा उचलणाऱ्या डॉक्टरांच्या एका चमूनं मुंबईतील शीव रुग्णालयात किमया केली. जवळपास १००हून अधिक कोरोनाबाधित गरोदर महिलांची प्रसूती या डॉक्टरांनी केली. ज्यामध्ये तीन नवजात शिशु वगळता इतर सर्व बालक हे कोरोना निगेटीव्ह असल्याचा अहवाल आला आणि रुग्णालय प्रशासनानं सुटकेचा नि:श्वास सोडला.
मुळात कोरोनाची लागण झालेल्या या महिलांची प्रसूती करणं हे डॉक्टरांपुढं असणारं एक आव्हानच होतं. ज्यामध्ये त्यांना तांत्रिक आणि काही प्रमाणात मानसिक संकटांचाही सामना करावा लागला होता, अशी माहिती रुग्णालयातील गायनॅक विभाग प्रमुख डॉ. अरुण नायक यांनी दिली.
कोरोनाबाधित गरोदर महिलांना हाताळत असतेवेळी या डॉक्टरांच्या चमूला आधार होता तो म्हणजे 'पर्सनल प्रोटेक्टशन' अर्थात 'पीपीई किट्स'चा. रुग्ण हाताळण्यासाठीच्या सर्व नियमांचं अतिशय काटेकोरपणे पालन करतच या चमूनं हे आव्हान पेललं. पीपीई किट, मास्क, फेस शिल्ड अशा पद्धतीनं डॉक्टरांनी स्वत:च्या संरक्षणार्थ वेष परिधान करत नव्या जीवांना या जगात आणलं. बरं ही परिस्थिती आणि कोरोनाचं संकट पाहता अडचणींची साखळी काही केल्या तिची पकड सैल होऊ देत नव्हती. पण, त्यातही हा चमू मात्र जिद्दीनं त्यांच्या कामावरच लक्ष केंद्रीत करत होता.
ही होती डॉक्टरांपुढची आव्हानं...
गरोदर महिलांच्या प्रसूतीच्या वेळी रक्तस्त्राव किंवा कोणत्याही प्रकारचं द्रव्य डॉक्टरांच्या चेहऱ्यांवर उडणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. ज्यामध्ये पीपीई किटची मोठी मदत झाली. हे किट प्लास्टिकने तयार करण्यात आल्यामुळे अधिक काळासाठी ते परिधान करणं हेसुद्धा डॉक्टर आणि परिचारिका सोबतच इतर कर्मचाऱ्यांपुढचं एक आव्हान. शिवाय यादरम्यान वापरली जाणारी फेस शिल्ड पाहता त्याचा सर्वसामान्य नजरेवरही परिणाम होतो. शिल्ड अनेकदा धुरकट होत असल्यामुळं, शस्त्रक्रिया करतेवेळी नजर स्थिर ठेवणंही कमालीचं कसब पाहतं. पण, यातही आपल्या चमूकडून मात्र सर्वतोपरीनं काळजी घेत या शस्त्रक्रिया पार पाडण्यात आल्या, अशी माहिती डॉ. नायक यांनी दिली.
प्रसूतीनंतर कक्षाचं निर्जंतुकीतरण...
प्रसूती करण्याचा टप्पा पार केल्यानंतर कोरोनाबाधितांचा वावर असणारं कक्ष लागलीच निर्जंतुक करण्यात आलं. इतक्यावरच न थांबता प्रसूतीच्या वेळी वापरण्यात आलेल्या खाटांचंसुद्धा सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतुकीकरण करण्यात आलं. जेणsकरुन दुसऱ्या रुग्णांना याचा संसर्ग होणार नाही.
आई आणि बाळ एकत्रच....
डॉक्टांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसूतीनंतर, या सर्व महिलांना त्यांच्या नवजात बालकांसोबतच ठेवण्यात आलं. पण, त्यांना इतर कोणालाही भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. 'नियमांनुसार प्रसूतीनंतर महिला आणि त्यांच्या बाळाला एकत्रच ठेवण्यात आलं. पण, यातही सुरुवातीला नवजात शिशुला कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सानिध्ध्यात ठेवल्यास कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी भीती होती. शिवाय कोविड पॉझिटीव्ह महिलांकडून गर्भाशयातच बाळाला कोरोनाचा संसर्ग होण्याचीही भीती सुरुवातीला होती. मात्र निरिक्षणातून निष्पन्न झाल्यानुसार अनेक बालकांना कोरोनाची लागण झाली नव्हती', असं डॉक्टर म्हणाले.
एकिकडे कोरोनाच्या दहशतीनं भल्याभल्यांना घाम फुटत असतानाच शीव रुग्णालयात जन्मलेल्या या नवजात शिशुंपैकी दोघांच्या चाचणीचा अहवाल अवघ्या आठ तासांमघ्ये निगेटीव्ह आला होता. तर, आणखी एका बालकाने पाचव्या दिवशी या विषाणूवर मात केली होती.
सध्याच्या घडीला या सर्व बालकांची प्रकृती उत्तम असून, त्यांना रुग्णालयातून रजाही देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे आईपासून वेगळं करण्यात आलेलं नाही. शिवाय प्रसूत महिला नियमांनुसारच त्यांच्या बालकांना स्तनपानही करत आहेत. त्यामुळे मातृत्त्वाच्या या नव्या टप्प्यात सावधगिरी बाळगली जात असली तरीही दुराव्याचा मात्र लवलेशही नाही हेच स्पष्ट होत आहे.
गरोदर महिलांना भेडसावणारी भीती...
कोरोनाचं थैमान पाहता, गरोदर महिलांच्या मनातही या विषाणूच्या संसर्गाविषयी कमालीची भीती होती. त्यामुळं या परिस्थितीत त्यांच्या मनातील भीतीही या डॉक्टांनाच हाताळावी लागली. याचविषयी सांगताना डॉ. नाईक म्हमाले, 'सुरु्वातीच्या काळात महिलांच्या प्रसुतीविषयी काहीच स्पष्ट नव्हतं. बाळाला कोरोनाची लागण झाली असेल का, इथपासून अनेक प्रश्न उभे राहिले होते. पण, जसजशा प्रसूती होऊ लागल्या आणि बाळाला गर्भाशयात कोणत्याही प्रकारचा कोरोना संसर्ग होत नसल्याची बाब उघड झाली तेव्हा इतर महिलांसाठी ही बाब दिलासादायक होती. तुम्ही घाबरु नका, असं आम्ही त्यांना सांगत होतो'.
25 वरिष्ठ डॉक्टर, 50 कनिष्ठ डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी अशा प्रत्येकाच्याच योगदानानं ही आव्हानं विभागून पेलण्यात आली. डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठीसुद्धा कमालीची काळजी घेतली गेली.
जेव्हा डॉक्टरांच्या या कर्तृत्वाची माहिती सर्वांसमक्ष आली, तेव्हा अनेकांनीच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ही बाब आपल्यासाठी अत्यंत समाधानकारक असल्याचं म्हणत सध्याच्या घडीला प्रत्येक रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे कमालीचं योगदान देत असल्याचं वास्तव डॉ. नाईक यांनी अधोरेखित केलं. अशा प्रसंगी मी जनतेला विनंती करतो, ती रस्त्यावर थुंकणं टाळा, मास्कचा सतत वापर करा, लक्षणांची तीव्रता वाढल्यास रुग्णालयात या. इतरांच्या आरोग्याची काळजी घ्या. ही परिस्थिती कुठवर आपल्याला आयुष्याला प्रभावित करणार याची कल्पना नाही. पण, किमान प्रतिबंधात्मक उपाय योजत संसर्गाला नियंत्रणात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असं म्हणत आग्रही सूर त्यांनी आळवला.
'त्या' वादग्रस्त प्रकरणावरुन टीका करण्याऱ्यांविषयी डॉक्टर म्हणतात....
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियापासून वैद्यकिय क्षेत्रामध्ये सर्वत्रच सायन रुग्णालयात मृतहेदाशेजारीच रुग्णांवर उपचार केले जाण्याच्या प्रकरणी होणाऱ्या टीकांवरही त्यांनी वक्तव्य केलं.
'जे निंदा करतात त्यांना डॉक्टरांच्या कार्याचा जराही अंदाज नाही. त्यांना सद्यस्थितीचा अंदाज असता कर, अशा प्रकारच्या टीका करण्यात आल्या नसत्या. कक्षात एका रुग्णाचा मृत्यू होत आहे आणि त्याच्या शेजारी एक खाट रिकामी आहे. अशा वेळी तिथे गंभीर परिस्थितीतच रुग्ण आल्यास यावेळी त्या रुग्णावर उपचार केले जाणं अधिक महत्त्वाचं आहे. अशा वेळी त्या रुग्णाचं आयुष्य महत्त्वाचं असतं', असं ते म्हणाले. मुळात अशा महामारीच्या परिस्थितीत तर, आपण खाटा रिकाम्या ठेवूच शकत नाही ही बाब त्यांनी स्पष्ट केली.
वाचा : सोमवारपासून बेस्ट बससेवा बंद होण्याची चिन्हं
मृतदेसाठीसुद्धा काही नियमावली लागू करण्यात आली आहे, ज्याचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे. कारण त्या माध्यमातूनही कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये पोलीस कारवाईसुद्धा करण्यात येते. त्यामुळे ही प्रक्रिया पाहता टीकाकारांनी ही बाब लक्षात घेतली जाणं अतिशय महत्त्वाचं असल्याचा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला आहे.