महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या आमदारांनी नाही केलं मतदान
शिंदे सरकार पहिल्या अग्नीपरीक्षेत पास झाले आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत उद्धव ठाकरे विरुद्धच्या पहिल्या लढतीत एकनाथ शिंदे गटाने बाजी मारली आहे. भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेत. त्यांनी 164 मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार राजन साळवी यांना 107 मते पडली.
सभापती निवडीच्या वेळी समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी मतदानात भाग घेतला नव्हता. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाने दावा केल्यानुसार भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली.
एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे बंडखोर शिवसेना आमदार शनिवारी रात्री गोव्यातून मुंबईत परतले आणि त्यांना दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये काँग्रेसचे नाना पटोले यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.
विधानसभेत शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीकडे 53, काँग्रेसकडे 44, भाजपकडे 106, बहुजन विकास आघाडीकडे तीन, समाजवादी पक्षाकडे दोन,
एमआयएमचे दोन, प्रहार जनशक्ती पक्षाकडे दोन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे एक, शेतकरी कामगार पक्षाकडे एक, स्वाभिमानी पक्षाकडे एक, राष्ट्रीय समाज पक्षाकडे एक, जनसुराज्य शक्ती पक्षाकडे एक, क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडे एक, आणखी 13 अपक्ष आमदार आहेत.
कोण होते अनुपस्थित?
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे मे महिन्यात निधन झाल्याने एक पद रिक्त आहे. राष्ट्रवादीचे अन्य दोन आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे ते अनउपस्थित होते.
- राष्ट्रवादीचे निलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, बबनदादा शिंदे, नरहरी झीरवळ (अपवाद--मतदान करू शकत नाहीत)
- भाजपचे मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप
- एमआयएमचे मुफ्ती इस्माईल
- काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, जितेन अंतापूरकर
- समाजवादी पक्षाचे अबू आझमी, रईस शेख आणि एमआयएमचे शाह फारुख अनवर हे तठस्थ राहिले.