`ते` माझ्या कुटुंबीयांना इजा पोहोचवू शकतात; मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सुरक्षा पुरवावी`
आता राज्य सरकार मदन शर्मा यांना सुरक्षा पुरवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: कथित शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आलेले निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी आता सुरक्षेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. मदन शर्मा यांनी म्हटले की, हल्लेखोर माझी मुले, कुटुंबीय आणि मला इजा करु शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला व माझ्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी मदन शर्मा यांनी केली. त्यामुळे आता राज्य सरकार यासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
... हा तर सरकार पुरस्कृत दहशतवाद; देवेंद्र फडणवीसांची महाविकासआघाडीवर टीका
मदन शर्मा यांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यामुळे सात ते आठ जणांनी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे दोन शाखाप्रमुख आणि सात ते आठ कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा दावा भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यातही घेतले होते. मात्र, त्यांना लगेच सोडून देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
महाराष्ट्रात सरकारचे अत्याचार वाढलेत, केंद्राने हस्तक्षेप करावा- कंगना राणौत
मदन शर्मा यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा मुद्दा सोशल मीडिया आणि राष्ट्रीय पातळीवरही गाजत आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला होता. काही गुंडांनी माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यासंदर्भात अधिकाऱ्याला फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी सैनिकांवर अशाप्रकारे हल्ले होणे ही बाब खेदनजक आणि खपवून घेण्याजोगी नाही, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.