Third Mumbai: मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरातील लोकसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रात तिसरी मुंबई उभारण्याच्या प्रयत्नात आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. अटल सेतूजवळ तब्बल 124 गावांची मिळून तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे. तिसरी मुंबई उभारण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. एमएमआरडीएद्वारे रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे. याचे चेअरमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या मुंबईसाठी नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील (नैना) 80 व खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रातील 33 गावांसाठी सिडकोची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, आता ती नेमणूक रद्द करत ही जबाबदारी एमएमआरडीएला देण्यात आली आहे. तिसऱ्या मुंबईसाठी तब्बल 124 गावांतील जमीन राज्य सरकार एमएमआरडीएद्वारे संपादीत करुन सिडकोच्या धर्तीवर संपादित करणार आहे.


124 गावांचा समावेश


अटल सेतूच्या पलीकडे एमएमआरडीएच्या माध्यमातून एनटीडीएअंतर्गंत  (New Town Development Authority - NTDA) 124 गावांच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. न्हावा शिवडी सी लिंक अर्थात एमटीएचएलच्या पलीकडे 124 गावांच्या परिसरातील 323 चौकिमी क्षेत्रात तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे. यासाठी सिडको संचालक मंडळाने नैना क्षेत्रातील 80 गावे वगळण्यास मान्यता दिली आहे. त्यापाठोपाठ एमएमआरडीएनेही तिसऱ्या मुंबईचे क्षेत्र एमटीडीएअंतर्गंत विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. 


हायटेक सुविधा असणार


तिसरी मुंबई पनवेल, उरण दरम्यान उभारण्यात येणार आहे. पनवेल, उरण तालुक्यातील या गावांचा झपाट्याने विकास होणार आहे. तर, या परिसरातही अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहे. मुंबई-नवी मुंबई प्रमाणेच तिसऱ्या मुंबईचाही विकास करण्यात येणार आहे. तिसरी मुंबईत व्यावसायिक संकुले, शाळा, रुग्णालय, मैदान यासारख्या अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.


तिसऱ्या मुंबईला जोडण्यासाठी रिंग रोड


तिसऱ्या मुंबईला नवी मुंबई-मुंबईला जोडण्यासाठी रिंग रोडदेखील उभारण्यात येणार आहे. तिसरी मुंबई हा नवी मुंबई व मुंबईचा मध्य आहे. नवी मुंबई विमानतळाच्या लगतच हा नवीन प्रकल्प असणार आहे. हैदराबाद आणि अहमदाबाद शहराच्या धर्तीवर एक एक्सेस कंट्रोल रिंग रोड निर्माण केला जाणार आहे.