मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेत. मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबतची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे.


पहिला अपघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी २५ मे २०१७ ला निलंग्याहून लातूरला जात असताना मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला होता. जोरदार वारे वाहत असल्याने ट्रान्सफॉर्मरची वायरमध्ये अडकल्याने स्पार्क झाला होता. 


रायगडमध्ये दुसरा अपघात


दुसरी अशीच काहीशी घटना रायगडच्या अलिबागमध्ये 7 जुलै रोजी घडली होती. डोलवि-धरमतर इथल्या जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर हेलिकप्टरमध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्य़ांना बाजूला घेतल्यानं अनर्थ टळला. मात्र हे वृत्त अफवा असल्याचे सांगण्यात आलं होतं. 


हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन


आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दुर्घटना होता होता टळली. या दुर्घटनेत मुख्यमंत्री थोडक्यात बचावलेत. नाशिक मुक्कामी असणऱ्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर उड्डाणानंतर पुन्हा खाली उतरवण्यात आलं. हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यानं एकाला खाली उतरवून दिल्यानंतर पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यासह मुख्यमंत्री औरंगाबादला रवाना झाले. सारंगखेडाच्या चेतक महोत्सवाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री रात्री उशिरा नाशिक मुक्कामी आले होते. सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवरून त्यांच्यसह हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवण्यात आलं. दरम्यान, नाशिक मुक्कामी मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांशी चर्चा करून शहरातील कामकाजाचा आढावा घेतला.