मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतरही मुंबईतील गर्दी अजून अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी महापालिकेची मुंबईतील ९२ मार्केट बंद करण्याचे आदेश महापालिकेनं दिले आहेत. या ९२ मार्केटमध्ये तब्बल १७ हजार दुकानं आहेत. महापालिकेच्या मार्केटमधील दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी त्यातील भाजीपाला, दूध, किराणा, मटण आणि मासळीची दुकानं सुरु राहणार आहेत. या उपाययोजनेमुळे मुंबईतील काही प्रमाणात गर्दी कमी होईल असा पालिकेला विश्वास आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय काही भागातील दुकानं एक दिवसाआड बंद ठेवण्याचे आदेशही महापालिकेनं काढले आहेत. मुंबई महापालिकेच्या डी वॉर्डमध्ये म्हणजे ग्रँट रोड, मलबार हिल, महालक्ष्मी, ताडदेव, मुंबई सेंट्रल, गिरगाव या भागातील वेगवेगळ्या रस्त्यावरील दुकानं एक दिवसाआड बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यानुसार काही रस्त्यावरची दुकानं सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार बंद राहतील, तर काही रस्त्यावरील दुकानं मंगळवार, गुरुवार, शनिवार सुरु राहणार आहेत.  जीवनावश्यक वस्तू आणि औषधांच्या दुकानांना मात्र यातून वगळलं आहे.


मुंबई महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुंबईतलं मोठं मार्केट असलेल्या दादरमध्येही दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय दादर व्यापारी संघानं घेतला आहे. गुढीपाडव्यापर्यंत दादरमधील दुकानं बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती दादर व्यापारी संघानं दिलीय. दादर व्यापारी संघाची ९०० दुकानं सदस्य आहेत. त्यापैकी दादर पश्चिमेकडील ६१० दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मुंबईतील मॉल याआधीच बंद करण्यात आले आहेत. शिवाय शाळा आणि कॉलेजही बंद करण्यात आली आहेत. बस, रेल्वेमध्ये कमीत कमी प्रवाशांनी प्रवास करावा यासाठी आवाहन केलं जात आहे. वर्क फ्रॉम होम आणि सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याचा उपायही देण्यात आला आहे. बेस्टमध्ये उभं राहून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेल्वेमधील गर्दी आणखी कमी करण्याचा प्रयत्न असून रेल्वेतील गर्दी कमी झाली नाही तर रेल्वे बंद करावी लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पण अशी वेळ येऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी मुंबईकरांना केलं आहे.