मुंबई :  गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेकदा कलाटणी मिळाली. अनेक अनपेक्षित, उत्कंठा वाढवणाऱ्या घडामोडी आणि घटनांनी राजकीय निरीक्षक आणि राज्यातील जनतेलाही अनेकदा आश्चर्याचे धक्के दिले. अनपेक्षित राजकीय संघर्ष पाहायला मिळाले. त्यापैकीच एक होता शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष. निवडणुकीआधीच एका घटनेनं या संघर्षाची चर्चा झडली होती. अजित पवार आमदारकीचा राजीनामा देऊन गायब झाले होते. त्यावेळी पडद्यामागे काय घडलं? अजित पवार कुठे आहेत हे कसं शोधून काढलं? याची रंजक कहाणी पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘चेकमेट : हाऊ दी बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात कथन केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणूक तोंडावर होती. विरोधी पक्षांचं फारसं अस्तित्वच जाणवत नव्हतं. त्यावेळी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चौकशीसंदर्भात नोटीस बजावली. राजकारणात कसलेल्या पवारांनी या संधीचा असा काही फायदा उठवला की सगळं राजकारण त्यांच्याभोवती केंद्रीत झालं होतं. स्वतःच ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्याचा निर्णय पवारांनी जाहीर केला होता. सत्ताधारी बलाढ्य भाजपासमोर गलितगात्र वाटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवणी मिळाल्याचं चित्र निर्माण झालं होतं.


शरद पवारांनी चौकशीसाठी जाऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकारी, पोलीस आयुक्त यांना त्यांच्याकडे जाऊन विनवणी करावी लागली होती. अखेर पवारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची विनंती मान्य केली आणि आपल्याला हवे होते ते साध्य केले. जणू पवारांनीच लिहिलेल्या पटकथेनुसार काही दिवस सगळा फोकस त्यांच्यावर होता. पण ज्या दिवशी हा सगळा कळसाध्याय झाला, त्याच दिवशी संध्याकाळी शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे दिला आणि कुणाला काहीही न सांगता गायब झाले.


अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या बातमीने पवारांचा ईडी अध्याय बाजुला पडला आणि पवार काका-पुतण्यांमधील संघर्षाच्या बातम्यांनी वृत्तवाहिन्यांचा पडदा व्यापला गेला....


अजित पवार होते कुठे?


अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा का दिला आणि ते गेले कुठे? याचीच चर्चा सगळीकडे सुरु झाली. ईडी चौकशीचा डाव भाजपवर उलटवण्याच्या नाट्यात अजित पवार कुठेच नव्हते याचीही चर्चा सुरु झाली. अजित पवारांना डावलल्याने ते नाराज झाले आणि त्यांनी आमदारपदाचा राजीनामा दिल्याचा निष्कर्षही काढला गेला. अजित पवार कुठे आहेत याचा पत्ता ना शरद पवारांना होता, ना राष्ट्रवादीच्या नेत्यांना. त्यामुळे अजित पवारांचे विश्वासू सहकारी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा शोध घेत होते. सरकारमधील मंत्र्यांबरोबरच अन्य पक्षाच्या नेत्यांनाही अजित पवार कुठे गेले याची उत्सुकता होती. अखेर राष्ट्रवादीच्या एका नेत्याने एटीएसच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि अजित पवार कुठे आहेत हे शोधण्यास सांगितले.


सॉफ्टवेअरच्या सहाय्याने शोध


एटीएसच्या अधिकाऱ्याने त्यांच्याकडे असलेल्या एका सॉफ्टवेअरच्या सहाय्याने अजित पवार यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. हे सॉफ्टवेअर विशेषतः गँगस्टर किंवा दहशतवादी कुठे लपला आहे याचा शोध घेण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे ज्या व्यक्तिचा शोध घ्यायचा आहे, त्याचा फोन बंद असला तरी या सॉफ्टवेअरने ती व्यक्ति कुठे आहे याचा शोध घेता येतो. अजित पवारांना शोधण्यासाठी याच सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली. त्यानुसार अजित पवार दक्षिण मुंबईतच असल्याचे लक्षात आले. अजित पवार दक्षिण मुंबईत नेमके कुठे आहेत? यासाठी आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आला. तेव्हा ते नेपियन्सी रोडवरील श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी असल्याचे दिसून आले. अजित पवार त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी असल्याची माहिती एटीएस अधिकाऱ्याने मग राष्ट्रवादीच्या नेत्याला दिली.


अजित पवार कुठे आहेत याची माहिती मिळाल्यानंतर मग अजित पवारांचे विश्वासू सहकारी असलेले तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांना बोलावले आणि दोघेजण अजित पवारांना भेटायला श्रीनिवास पवार यांच्या घरी गेले.


 



पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘चेकमेट : हाऊ दी बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात गतवर्षी राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षाची पडद्यामागची कहाणी उलगडून दाखवली आहे. त्यात वरील घटनेचं वर्णन सुधीर सूर्यवंशी यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत केले आहे.