मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली बोट नेमकी कशी बुडाली, याबाबतची नवी धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती आली आहे. गेट वे ऑफ इंडियासमोरच्या अरबी समुद्रात कुलाबा लाईट हाऊसजवळ काल ही बोट बुडाली. खडकाला आदळल्यानं या बोटीला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात होती. मात्र, हा अपघात खडकामुळे नाही तर अन्य दुसऱ्याच कारणाने झाल्याचे पुढे आलेय. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बोट दुर्घटनेनंतर 'झी २४ तास'नं आज दुर्घटनास्थळी जाऊन आढावा घेतल्यानंतर नवी धक्कादायक माहिती उजेडात आली. बोट खडकाला आपटून नव्हे, तर समुद्रात काही वर्षांपूर्वी बुडालेल्या मोठ्या जहाजाच्या सांगाड्याला धडकली, अशी माहिती स्थानिक मच्छिमारांनी दिली आहे. १९९२ - १९९३ च्या सुमारास कुलाबा लाईट हाऊसजवळ हे जहाज बुडालं होतं. त्याचा सांगाडा अद्यापही तिथंच आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा सांगाडा वेळीच काढला असता तर कालची घटना टळली असती. दरम्यान, हा सांगडा आजही तेथेच आहे. त्यामुळे भविष्यातही दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील बुडालेला सांगाडा काढण्याची मागणी स्थानिक आणि मच्छिमारांनी केलेय.


कुलाब्यातील स्थानिक मच्छिमारांना जहाजाच्या सांगाड्यालाची कल्पना असल्यानं या भागात जाताना ते काळजी घेतात. याआधी २००८ साली देखील याठिकाणी मच्छिमारांच्या ट्रॉलरला अपघात झाला होता. त्यावेळी भास्कर तांडेल या मच्छिमारानं ७ जणांचे जीव वाचवले होते.