साकीनाका आग दुर्घटनेप्रकरणी तिघांना अटक
आगीच्या दुर्घटनेत दोघांनी गमावला होता जीव
मुंबई : साकीनाका खैराणी रोड येथे लागलेल्या आगीत दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. याबाबत साकीनाका पोलिसांनी सुमारे २४ तासांनंतर गुन्हा नोंदवला आहे. यात मथुरादास भद्रा, प्रताप गौरी, उडायलाला गौरी आणि खेमसिंग राजपूत यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या तिघांना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. प्रताप गौरी फरार असून अद्याप अटक करण्यात आली नाही. याबाबत साकीनाका पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत.
साकीनाका खैराणी रोडवर असलेल्या आशापुरा कंपाउंडमध्ये सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास गोदामाला आग लागली. या कंपाउंडमध्ये केमिकल, कपडे, भंगार तसेच रेडिमेड कपड्याचे तसेच लाकडी सामानाचे गोदाम आहे.
या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तब्बल ६ तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं. घाटकोपरच्या वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचं सांगण्यात आलं. याबाबत वाहतूक पोलिस सहाय्यक आयुक्तांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याचं समोर आलं.
साकीनाका भागातील ही पहिलीच घटना नाही. येथे अनेकदा अशा घटना घडतात. त्यासाठी अनधिकृत कारखाने जबाबदार असल्याचं काराण पुढे आलं आहे.