टॅक्सी चालक - प्रवाशांमधला वाद टाळण्यासाठी अनोखी शक्कल
मुंबईतल्या टॅक्सींच्या टपावरही हिरवा, लाल आणि पांढऱ्या रंगाचे दिवे दिसणार
मुंबई : भाडं नाकरण्यावरून टॅक्सीचालक आणि प्रवाशांमधील वाद मुंबईत नित्याचाच, हे टाळण्यासाठी मुंबई परिवहन विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. विदेशातील टॅक्सीप्रमाणे आता मुंबईतल्या टॅक्सींच्या टपावरही हिरवा, लाल आणि पांढऱ्या अशा तीन रंगाचे दिवे लावण्यात येणार आहेत. परदेशातही टॅक्सीवर अशा प्रकारचे दिवे दिसतात.
हिरवा दिवा सुरु असल्यास प्रवाशांना टॅक्सी उपलब्ध असेल, लाल दिवा म्हणजे टॅक्सीत प्रवासी प्रवास करीत आहे, आणि पांढरा दिवा सुरू असल्यास टॅक्सी सार्वजनिक प्रवासासाठी उपलब्ध नसून खासगी वापरात आहे असा अर्थ असेल.
येत्या १ फेब्रुवारीपासून २०२०पासून काळी पिवळी टॅक्सीच्या रुपात हा बदल होणार असल्याचं परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी म्हटलंय.
भाडे नाकारण्यावरून टॅक्सी चालक प्रवासी यावरून अनेकदा वाद होत असतात. शिवाय अनेक टॅक्सी चालकांवर यावरून कारवाईदेखील झाली आहे. त्यामुळे हे वाद टाळत प्रवास व्हावा यासाठी परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षभरात महाराष्ट्र भरात रॅश ड्राव्हिंग, ड्रिंक अँड ड्राइव्ह या सारख्या आणि इतर कारणांमुळे १५ हजारांपेक्षा अधिक लोकांच्या वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.