मुंबई : मुंबईतल्या मालाड इथल्या क्रीडांगणाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली असतानाच आता शिवसेनेनंही त्यात उडी घेतली आहे. मंत्री अस्लम शेख यांच्यावर टीका करताना भाजपने शिवसेनेवरही शरसंधान साधलं. त्यामुळे  शिवसेनेनंही भाजपला उत्तर दिलं आहे. मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी अस्लम शेख यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा देत आणि पुरावे सादर केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टिपू सुलतान नावाच्या प्रस्तावाला भाजपचं समर्थन होतं, 2001 आणि 2013मध्ये भाजपनेचं  प्रस्ताव मांडले होते, असा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. नगरसेवक असताना अमित साटम यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलं होतं असं सांगत किशोरी पेडणेकर यांनी पुरावे दाखवले. 


यावर हे पुरावे खोटे असून जो प्रस्ताव त्यावेळेला मंजुर झाला होता, त्यावर खाडाखोड करुन माझं चुकीचं नाव त्यात टाकलं, हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे.


किशोरी पेडणेकर यांनी दिलं उत्तर
यावर आज पुन्हा पत्रकार परिषद घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमित साटम यांचे आरोप खोडून काढले. नामकरणाचे मुद्दे हे शहर स्थापत्य समितीकडे येतात, उपनगर समितीत दोन्ही अध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे होते. त्यानंतर हाऊसमध्येही तो विषय पास झाला, तेव्हा अमित साटम यांनी अनुमोदन दिलं होतं. 


२०१५ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हाच एक पत्र आहे,२८ ऑगस्ट २०१५ चे हे पत्र आहे, यावर एकनाथ खडसे यांची सही आहे आणि यावर लक्षवेधी घेतली होती. अस्लम शेख आमदार होते, तेव्हा मैदानाच्या दुरुस्तीसाठी लिहिलेल्या पत्रात मैदानाचं नाव टिपू सुलतान असंच होतं. 


कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम
मैदानाच्या मुद्दयावरु कालचा संपूर्ण दिवस भाजपने कायदा-सुव्यवस्था बिघडवली. जे आता विरोध करत आहेत, त्यांनी आधी उत्तर द्यावं तुमचा विरोध २०१९ पासून सुर झाला आहे का? नावाला भाजपचा आताच विरोध का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. 


शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, देशात अव्वल मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव घेतलं जात आहे, भाजपचा पहिल्या पाचमध्ये एकही मुख्यमंत्री नाही, त्यामुळे तो मुळव्याध भाजपाला सतत सतावतोय का? असा खोचक टोला महापौर यांनी लगावला आहे.


मुंबई अस्थिर करण्याचा प्रयत्न


मुंबई अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एक माजी आमदार म्हणतोय दंगल होणार, कोणाला दंगल हवी आहे. करुन तर दाखवा. ज्या मैदानाला नावच दिलं नाहीए, महापालिकेकडे नाव बदलाचा प्रस्तावच नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. मैदानावर जो बोर्ड आहे त्यावर महापालिकेचा लोगो नाही तर म्हाडाचा आहे, आमचं तर हेच म्हणणं आहे मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव द्या असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.