Vadapav Day : मुंबईकरांच्या वडापावाचा प्रवास तुम्हाला माहित आहे का?
अस्सल मराठी वडापाव सर्वांच्या पसंतीस उतरण्याचे कारण म्हणजे स्वस्त आणि मस्त तर आहेच, शिवाय सहज उपलब्ध होणारा आणि कुठेही खाता येणारा हा खाद्यपदार्थ.
मुंबई : आज जागतिक वडापाव दिवस. लोकल ते ग्लोबल अशी ओळख प्राप्त झालेला अस्सल मराठी वडापाव सर्वांच्या पसंतीस उतरण्याचे कारण म्हणजे स्वस्त आणि मस्त तर आहेच, शिवाय सहज उपलब्ध होणारा आणि कुठेही खाता येणारा हा खाद्यपदार्थ. सध्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये मिळत असला तरी आतील बटाट्याची भाजी आणि वरून बेसनचा कव्हर हा वड्याचा आत्मा मात्र कायम आहे. जागतिक वडापाव दिवसाच्या निमित्तानं वरळीतील प्रसिद्ध मंचेकर वडापाव स्टॉलवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी.
आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही. मात्र या वडापावचा जन्म नक्की कुठे झाला. तो आजच्या मॅक-डोनाल्ड्सपासून ते शेजवान वडापाव, स्वीटकॉर्न वडापावपर्यंत कसा आलाय हे जाणून घेऊयात.
१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली.
सुरवातीला वडापाव 10 पैशाला विकला जायचा. आज अगदी 10 रुपयांपासून ते अगदी 100 रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. आज कुठेही आणि कधीही मिळणार वडापाव त्यावेळेस दुपारी दोनच्या सुमारास गाडी लागायची आणि आठ-साडेआठ पर्यंतच ती गाडी सुरु असायची. दादर, परळ, गिरगावमध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावड्याला हक्काचं घर मिळालं.
सुरुवातील बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पाव आणि वड्याचं कधीपासून जमलं याबद्दलची माहिती काही समोर आली नाही.
वडापाव मुंबईकरांसाठी एक रोजगाराचं साधन
1970 ते 1970 च्या काळामध्ये मुंबईतील गिरण्या बंद पडू लागले ज्यामुळे अनेक तरुण वडापावच्या गाडीकडे रोजगाराचे आणि पोट भरण्याचे साधन म्हणून पाहू लागले. त्यानंतर मात्र प्रत्येक गल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. मराठी लोकांच्या या धडपडीला पाठिंबा दिला तो शिवसेनेने. त्याचवेळी सेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध भूमिका घेतल्याने मुंबईमधील दादर, माटुंग्यासारख्या परिसरातील उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने वडापाव प्रमोट कऱण्यास सुरुवात केली.
उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा असे धोरण घेत सेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच केले. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगदी वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनवत या वडापावला राजकीय पाठिंबा दिला. आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनपासून ते मोठ्या मोठया मॅल्सपर्यंत वडापावने स्थान मिळवले आहे.
त्यानंतर वडापाव हा वेगवेगळ्या रुपात लोकांसमोर येऊ लागला. जसे की, वडापावामध्ये मक्क्याचे दाणे टाकणे, सेजवान वडापाव, चिज वडापाव, जम्बो वडापाव इत्यादी.
1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात दाखल झालेल्या वडापावाची दखल बाहिरील देशात देखील केली गेली, ज्यानंतर त्याला टक्कर देण्याासाठी मॅक-डोनाल्ड्सने ‘मॅक आलू टिक्की’ बाजारात आणली, ज्यामुळे परदेशातील भारतीय त्याकडे आकर्षीत झाले. तसे पहाता ‘मॅक आलू टिक्की’ हा वडापावच आहे फक्त त्याचा आकार आणि त्यात काही पदार्थ टाकून त्याला जास्त दराने विकले जायचे.
मुंबईतील उत्तम वडापाव मिळणारी काही ठिकाणे
आराम वडापाव
श्री कृष्णा बटाटावडा
आस्वाद
चेंबूर जीमखाना
अशोक वडापाव (किर्ती वडापाव)
मामा काणे
ठाण्यातील उत्तम वडापाव मिळणारी काही ठिकाणे
कुंजविहार
गजानन वडापाव
संतोष वडापाव
दुर्गा वडापाव
राजमाता वडापाव