मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!
Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Mumbai Local Train Status Megablock: मुंबईमधील मध्य रेल्वेने घेतलेल्या 63 तासांच्या मोठ्या मेगाब्लॉकमधील शेवटच्या टप्प्याचं काम आज पूर्ण होणार आहे. मात्र या कालावधीमध्ये गरज असेल तरच ट्रेनने प्रवास करा अशापद्धतीचं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये ठाणे स्थानकातील उर्वरित कामाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकामधील कामही केलं जाणार आहे. सीएसएमटी स्थानकातील 36 तासांचा मेगाब्लॉक आज दुपारी साडेबारा वाजता संपणार आहे. तर ठाण्यातील 63 तासांचा ब्लॉक आज दुपारी साडेतीन वाजता संपणार आहे. मात्र आजही प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची दाट शक्यता आहे.
आजही संपूर्ण दिवस गोंधळ कायम राहण्याची शक्यता
सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे आज मुख्य लाइनवरील लोकल गाड्या भायखळ्यापर्यंत धावणार आहेत. भायखळ्याबरोबरच परळ, दादर आणि वडाळ्यापर्यंतच लोकल सोडल्या जातील असं मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे. म्हणूनच आज घराबाहेर पडणाऱ्यांचेही हाल होणार आहे. मध्य रेल्वेने शुक्रवारपासून हाती घेतलेली कामं अंतिम टप्प्यात आहेत. मात्र ठाणे आणि सीएसएमटी या दोन्ही स्थानकांवरील कामं पूर्ण होण्यासाठी अर्ध्याहून अधिक दिवस जाणार हे निश्चित आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. म्हणजेच जवळपास संपूर्ण रविवारच यासाठी खर्च होईल असं चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळेच आजही लोकल ट्रेनने प्रवास टाळणं योग्य ठरणार आहे. गरज असेल तरच ट्रेनने प्रवास केल्यास होणारा संभाव्य मनस्ताप टाळता येईल.
500 हून अधिक लोकल ट्रेन्सच्या फेऱ्यांना फटका
आज दिवसभरातील 235 लोकलच्या फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 270 लोकलच्या फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 31 लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या असून 80 लांब पल्ल्याच्या ट्रेन अंशत: रद्द केल्या आहेत. त्यामुळेच मागील दोन दिवसांप्रमाणे आजही ज्या रेल्वे धावतील त्या उशीराने किंवा अनियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील असं चित्र दिसत आहे.
आज रद्द करण्यात आलेल्या अप मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या खालीलप्रमाणे :
मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस
पुणे- सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
पुणे- सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस
मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस
पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस
जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस
सोलापूर-मुंबई वंदेभारत एक्सप्रेस
मुंबईतून सुटणाऱ्या रद्द झालेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या खालीलप्रमाणे:
सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्सप्रेस
सीएसएमटी- नांदेड तपोवन एक्सप्रेस
सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस
सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस
सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस
सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस
सीएसएमटी- धुळे एक्सप्रेस
सीएसएमटी-जालना जनशताब्दी