मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठकही त्यांनी घेतली. यानंतर पर्यटन विभागाकडून लगेचच एक उपक्रम जाहीर करण्यात आलाय. राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचलनालयाकडून एक फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा जाहीर करण्यात आलीय. राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश - विदेशातील पर्यटकांना ओळख करून देणं तसंच गड-किल्ल्यांबद्दल आकर्षण निर्माण करणे हे स्पर्धेचं उद्दिष्ट असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, ऑनलाईन पद्धतीनं सोशल मीडियावरच ही स्पर्धा पार पडणार आहे.


खुल्या आणि व्यावसायिक विभागात स्पर्धा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. ८ ते २२ जानेवारी २०२० या काळात व्हिडिओग्राफी व छायाचित्रणाची ही स्पर्धा पार पडेल. खुली आणि व्यावसायिक अशा दोन विभागांत ही स्पर्धा पार पडेल. खुल्या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये आणि १० विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आलंय.


तर व्यावसायिक छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर दुसऱ्या श्रेणीत येतील. या विभागातील छायाचित्रणात पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि १० विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलंय. व्यावसायिक श्रेणीतील व्हिडिओग्राफी स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये व तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये असेल. १० विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळेल.