मुंबई: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करत लागत असताना शुक्रवारी ट्रान्स हार्बर रेल्वे सेवाही या स्पर्धेत उतरली. ट्रान्स हार्बरच्या पनवेल स्थानकाजवळ एक लोकल ट्रेन बंद पडल्याने या मार्गावरील वाहूतक काही वेळासाठी ठप्प झाली होती. सध्या ही ट्रेन बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरु झाली असली तरी वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी पनवेल स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे ही लोकल ट्रेन बंद पडली. ट्रान्स हार्बर मार्गावरील बहुतांशी लोकल या जुन्या आहेत. त्यामुळे या गाड्यांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड उद्भवत असतात. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. ही ट्रेन बिघडल्यामुळे ऐरोली-ठाणे मार्गावरील वाहतूक पूर्पणणे ठप्प झाली होती. या ट्रॅकवर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर ही लोकल ट्रेन रेल्वे मार्गावरून हटवण्यात आली. मात्र, यादरम्यानच्या काळात ट्रान्स हार्बरचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. परिणामी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्काळीत होताना दिसत आहे. या काळात रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना उद्घोषणा करून याबाबत माहितीही दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवाशांच्या संतापात आणखीनच भर पडली होती. बहुतांश वेळा वाहतूक कोलमडल्याने गाड्या उशिराने धावत असल्याचे निदर्शनास आले होते. ही वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी अनेक तास लागत असल्याने प्रवाशांना सातत्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.