योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पर्यावरण संतुलनासाठी वन विभागामार्फत वृक्ष लागवड केली जाते. मात्र या वृक्षांचं संवर्धन होताना दिसत नाहीय. ओझर टाऊनशिप इथं वनमंत्र्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. पण त्याचा कसा फज्जा उडाला.


रोपं उन्हाळ्यापूर्वीच वाळून गेली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओझर टाऊनशिप.. नाशिकमधली ही वसाहत... इथं एचएएल आणि वन विभागाच्या वतीनं वृक्ष लागवड अभियान राबवण्यात आलं. या कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. मात्र वनमंत्र्यांच्या हस्ते लावण्यात आलेली अनेक रोपं उन्हाळ्यापूर्वीच वाळून गेली आहेत.



लावलेली झाडं जगली नाहीत


राज्यात गेल्या 7 जुलैला 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्याला 20 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट असताना त्याच्या दीडपट वृक्ष लावण्यात आले. पण त्यासाठीची निगा मात्र राखण्यात आली नाही. 


इथं वृक्ष लागवडीसाठी खोदलेले खड्डे दिसतात, पण त्यात झाडंच दिसत नाहीत. आजुबाजूला गायी म्हशी मुक्तपणं चरताना दिसतायत. त्यामुळंच लावलेली झाडं जगली नाहीत, असं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे.


तक्रारीला जुजबी उत्तर देऊन टाळलं


पर्यावरण संतुलनासाठी 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित असणं गरजेचे आहे. राज्यात सध्या केवळ 20 टक्के वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र वाढावं यासाठी हॅलो फॉरेस्ट 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा, असंही आवाहन करण्यात आलं. 


मात्र संवर्धन होत नाही, या तक्रारीला जुजबी उत्तर देऊन टाळलं जातेय. पुढच्या वर्षी राज्यात 13 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय. पण आता खरी गरज आहे ती, लावलेल्या वृक्षांचं ऑडिट करण्याची.