कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान मातोश्री असलेला मुंबईतला वांद्रे पूर्व मतदारसंघ सुरूवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१५ साली आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांनी खुद्द नारायण राणेंना धूळा चारली होती. एका अर्थी जायंट किलर ठरलेल्या तृप्ती सावंत यांचे तिकीट यावेळी मात्र कापण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्याऐवजी या मतदारसंघातून महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना शिवसेनेने रिंगणात उतरवले. त्यामुळे खवळलेल्या तृप्ती सावंतांनी बंडखोरी केली. ज्या शिवसैनिकांनी तृप्ती सावंत त्यांच्या विजयासाठी आकाशपाताळ एक केले, त्यांनाच हरवण्यासाठी आता शिवसैनिकांना कष्ट घ्यावे लागत आहेत. 


बाळा सावंतांच्या पुण्याईच्या जोरावर तृप्ती सावंत जनतेला सामोऱ्या जात आहेत. घरोघरी जाऊन मतदारांना भेटत आहेत. विशेष म्हणजे त्या मातोश्रीवरही जाऊन मत मागणार असल्याचे समजते. एकूणच सावंत यांचा प्रचार धडाक्यात सुरु आहे.


तर दुसरीकडे महाडेश्वर स्थानिक नगरसेवक असल्याने त्यांच्यासाठी हा मतदारसंघ काही नवा नाही. शिवसेनेची संघटनात्मक ताकद त्यांच्या पाठिशी आहे. याशिवाय भाजप, आरपीआय या पक्षांचीही त्यांना चांगली मदत होईल. मात्र, सावंतांच्या बंडखोरीने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसपेक्षा युतीला कमी मते होती. हा खड्डाही महापौरांना भरावा लागणार आहे.


शिवसेनेतील अंतर्गत वादातूनच तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीला बळ मिळाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. परंतु यामुळे आता मातोश्रीच्या अंगणातला शिवसेनेचा गड धोक्यात आहे.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात युतीमुळे तिकीट कापल्या गेलेल्या शिवसैनिकांची जाहीर माफी मागितली होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तृप्ती सावंत यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, उद्धव ठाकरेंना आपल्या अंगणातली बंडखोरी शमवण्यात अपयश आले होते.