मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असून त्या अनुषंगाने पक्षाची दोन दिवसांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. यावेळी लोकसभेच्या उमेदवारीवरून काही मतदारसंघामध्ये बड्या नेत्यांमध्ये तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा, रायगड, पुणे, मावळ लोकसभेच्या या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, याबाबत सध्या उत्सुकता आहे. पक्षाच्या दोन दिवसांच्या पार पडलेल्या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कोण असेल याची प्राथमिक चाचपणी करण्यात आली. काही मतदारसंघात एकापेक्षा जास्त दिग्गज नेते इच्छूक असल्याने हे मतभेद समोर आले आहेत.


प्रामुख्याने लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता आहे. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे सातारचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या उमेदवारीला विरोध होतोय. उदयनराजे यांच्याऐवजी रामराजे नाईक-निंबाळकर यांना किंवा अन्य कुणालाही उमेदवारी द्यावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. नाईक-निंबाळकर यांच्याशिवाय श्रीनिवास पाटील हेही साताऱ्यातून इच्छूक आहेत.


काँग्रेसकडे असलेला पुणे मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितला आहे. या ठिकाणाहून शरद पवार निवडणूक लढवणार अशी चर्चा होती, मात्र पवारांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्याने पुण्यातून कोण उमेदवार असेल याबाबतही उत्सुकता आहे.


मावळ मतदारसंघातून अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार इच्छूक आहेत. कुटुंबातील लोकांनाच उमेदवारी मिळाली तर पक्ष वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असं सांगत पवारांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीला आपण अनुकूल नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र बैठक संपल्यानंतर याबाबत अद्याप बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत असे सांगत पार्थ अजूनही उमेदवारीच्या रेसमध्ये असल्याचं अजित पवारांनी सूचित केलंय. त्यामुळे मावळच्या उमेदवारीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.


रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरेंचा २०१४ साली थोड्या मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे २०१९ साली तटकरेच लोकसभेचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. मात्र बैठकीत भास्कर जाधव यांनी अनपेक्षितपणे रायगडमधून उमेदवारी मागितली आहे. तटकरेंनीही जाधवांना पाठिंबा दिल्याने रायगडमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.


माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत, पण तिथे एका माजी अधिकाऱ्याने उमेदवारील मागितल्याने माढ्यातील उमेदवारी कुणाला मिळणार यावरूनही चर्चा सुरू आहे.