MCA Election : एमसीए निवडणुकीत ट्विस्ट, शरद पवार करणार आशिष शेलार यांच्या क्लबकडून मतदान
भाजप नेते आशिष शेलार यांची मोठी खेळी, शरद पवार यांच्यासमोर दुहेरी पेच
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबई क्रिकेट संघटना (Mumbai Cricket Association) ही देशातील प्रतिष्ठित क्रीडा संघटनांपैकी एक आहे. या संघटनेची निवडणूक ही कोणत्याही राजकीय निवडणुकीपेक्षा कमी रंगतदार नसते. आता पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक (MCA Election 2022) जाहीर झाली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासाठी आता रणनिती ठरु लागल्या आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेवर गेली कित्येक वर्ष प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शरद पवार (Sharad Pawar) यांचं वर्चस्व आहे.
आता शरद पवार यांना आव्हान देण्यासाठी भाजपा (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) हे मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांच्या पॅनलकडून अध्यक्षपदासाठी संदीप पाटील (Sandeep Patil) हे रिंगणात उतरणार आहेत. तर संदीप पाटील यांच्या विरोधात आशिष शेलार हे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोनच आठवड्यांपूर्वी आशिष शेलार यांनी मिळवला क्लबवर ताबा
एकीकडे शरद पवार आणि आशिष शेलार हे एकमेकांविरोधात या निवडणुकीत असतील असे चित्र जरी निर्माण झाले असले तरी प्रत्यक्षात शरद पवार हे भाजपा आमदार आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या क्लबकडून या निवडणुकीत मतदान करणार आहे. शरद पवार हे नेहमीच पारसी पाओनिअर क्लबकडून मतदान करतात. आता हा क्लब दोन आठवड्यांपूर्वीच आशिष शेलार यांनी विकत घेतला आहे. यामुळे शरद पवार हे आशिष शेलार यांच्या क्लबकडून मतदान करणार हे स्पष्ट होतं. दरम्यान आशिष शेलार हे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लबकडून मतदान करणार आहेत.
आता या निवडणुकीत आशिष शेलार अध्यक्षपदाची निवडणूक लढवतात का ? आणि शरद पवार यांच्या पॅनलकडून उभे राहणाऱ्या माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव करणार का हे पाहणं रंगतदार ठरणार आहे.