रसिकलाल संकलचंद ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात दोघांना अटक
शेकडो गुंतवणूकदारांकडून भिसी योजनेतून पैसे अडकवले
मुंबई : मुंबईतल्या रसिकलाल संकलचंद ज्वेलर्सकडून गुंतवणुकीत ग्राहकांच्या झालेल्या फसवणुकीत दोन जणांना अटक करण्यात आलीय. जयेश रसिकलाल शाह आणि निलेश रसिकलाल शाह अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रसिकलाल संकलचंद ज्वेलर्सचं दुकान आहे. त्यांनी शेकडो गुंतवणूकदारांकडून भिसी योजनेचे पैसे घेतले होते. शिवाय अनेकांकडून मुदत ठेवीही घेतल्या होत्या.
जादा व्याजाच्या अमिषानं शेकडो ठेवीदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून रसिकलाल ज्वेलर्समध्ये फिक्स डिपॉ़जिट परत मिळत नव्हत्या. शिवाय सोनेचांदीच्या दागिन्यांच्या ऑर्डरही मिळत नव्हत्या. त्यामुळं ग्राहकांनी त्यांच्यामागं तगादा लावला होता. हे सुरु असतानाच ज्वेलर्स दुकानाला टाळं ठोकून पसार झाला. आता त्यातल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.