कोरोना काळात पाहा कसे लुटले? कामगार नवरा - कंत्राटदार बायकोने मुंबई पालिकेतून करोडो रुपये
मुंबई महानगरपालिकेतल्या दोन कामगारांनी बायकांच्या नावाने कंपनी स्थापन करुन मिळवली कोट्यवधीची कामं
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महानगरपालिकेत शिपाई पदावर काम करणाऱ्या दोन कामगारांनी आपल्या बायकांच्या नावे कंपनी स्थापन करुन कोट्यवधीची कामं मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील चतुर्थश्रेणी शिपाई अर्जुन नराळे आणि मेंटेनंस विभागातील शिपाई रत्नेश भोसले अशी या कामगारांची नावं आहेत. त्यांचे पगार काही हजार रुपये असले तरी त्यांच्या बायकांनी मात्र कोरोना काळात महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामं मिळवली आहेत.
अर्जुन नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे 'श्री एंटरप्रायजेस' नावाची कंपनी असून गेल्या दीड वर्षात त्यांनी 1 कोटी 11 लाख रुपयांची कामं मिळवली आहेत. तर रत्नेश भोसलेची पत्नी रियाच्या नावे 'आर. आर. एंटरप्रायजेस' नावाची कंपनी असून त्यांनी 65 लाख रुपयांची कामं मिळालीत. पालिकेच्या नाना चौकातल्या डी विभाग कार्यालयात विविध वस्तू पुरवठा करण्याचं काम या दोन कंपन्यांनी केलं आहे. स्क्रू ड्रायव्हरपासून कॉम्प्युटर पार्टपर्यंत आणि टेबलापासून भाड्याने गाड्या देण्यापर्यंतची काम या कंपनीमार्फत होत होती. माहितीच्या अधिकारातून हा सर्व घोटाळा समोर आला आहे.
मुंबई महापालिका अधिनियमानुसार पालिकेत नोकरीला असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांना पालिकेची कंत्राटे घेता येत नाहीत. पण या दोघांनी नियम धाब्यावर बसवत स्वत:च्या पत्नींच्या नावे कंपनी खोलून कोट्यवधींची कामे पदरात पाडून घेतली.
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्या तक्रारीनंतर डी विभागाच्या सहायक आयुक्तांनी हे प्रकरण चौकशी विभागाकडं देण्याची प्रक्रिया सुरु केलीय. तर या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करून दक्षता विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलीय...
पालिकेतल्या बड्या अधिकाऱ्यांशी साटंलोटं असल्याशिवाय दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी एवढं मोठं धाडस करणं शक्यच नाही. त्यामुळे या घोटाळ्याची पाळमुळं खणणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे.