Virar Crime News : बायकोच्या फोनवर बोलण्याच्या वादातून दोघा भावांची  भयानक अवस्था झाले. ज्या तरुणाशी बायको फोनवर बोलत होती त्याला जाब विचारायला गेलेला पती आणि त्याचा भाऊ दोघांवर हल्ला झाला. यात एका भावाचा मृत्यू झाला आहे. तर, एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे. विरार मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे विरार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार पूर्वेच्या साईनाथ नगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना विरार पोलिसांनी अटक केली आहे.


सचिन शिंदे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी रात्री  9.45 वाजताच्या सुमारास दत्तात्रय शिंदे याचे किरण शिंदे, राहुल शिंदे आणि अन्य एका तरुणाशी साईनाथ नगर नाका येथे भांडण झाले. माझ्या बायकोशी फोनवर का बोलतो? याचा जाब विचारताना हा वाद झाला. 


तिघेही त्याच्याशी भांडू लागले यावेळी राहुल शिंदे याने दत्तात्रय याच्यावर हल्ला केला. मात्र, दत्तात्रेय शिंदे याच्या बचावासाठी आलेला त्याचा लहान भाऊ सचिन शिंदे याच्या पोटात राहुल शिंदे याने चाकूने वार केला. तसेच दत्तात्रय याच्यावर देखील हल्ला केला.  दोघा भांवाना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


या हल्ल्यात  सचिनचा रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. तर, दत्तात्रय याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी विरार पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली असून फरार असलेल्या एकाचा शोध घेत आहेत.


साताऱ्यातून शस्त्र विकणारी जेरबंद


मध्यप्रदेशातून शस्त्र आणून महाराष्ट्रात विकणारी टोळी सातारा पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून 5 पिस्टल आणि 10 काडतुसे असा एकूण 3 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावर विरमाडे येथे ही टोळी शस्त्र विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना समजली होती त्यानंतर सापळा लावून या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.


दारूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी करायचे चोरी


नागपूरात घरफोडी करणाऱ्या दोघांना मानकापुर पोलिसना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमाल सह दोन दुचाकी परत मिळवण्यात यश आले. मिंटू साखरे आणि श्रेयस पाटील अशी अटक आरोपीचे नाव आहे. मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे अमित जयस्वाल बाहेगावी गेले होते. दुसऱ्या दिवशी परत आले असताना घराचे दार तुटलेले होते. घरात चोरी झाल्याचे समजताच त्यांनी मानकापूर पोलीसाना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.  दारूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी ते चोरी करत असल्याच तपासात समोर आले आहे.