उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय २० कोटींचा
आजच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय
मुंबई : गुरुवारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत सहा कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधीनंतर पहिली कॅबिनेटची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत हे सहा मंत्री उपस्थित आहेत.
'हे सर्वसामान्य जनतेचं सरकार असेल... त्यात कुणालाही दहशत वाटेल असं वातावरण राहू देणार नाही... महाराष्ट्र नंबर एकचं राज्य करू' अशी ग्वाही देत आजच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटींचा निधी मंजूर
पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले त्यातील पहिला निर्णय म्हणजे, रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटींचा निधी मंजूर करणं... 'छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडाच्या संवर्धनासाठीचा पहिलाच प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत आला. आत्तापर्यंत या कामासाठी २० कोटींचा खर्च झाला आहे. आज आणखीन २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचं भाग्य मंत्रिमंडळाला मिळालं' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.
'शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत नाही...'
तसंच, 'शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आत्तापर्यंत जाहीर केलेल्या आहेत, सुरु आहेत त्याचे वास्तव मांडण्याच्या सूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांना केलेल्या आहेत. नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत... शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करणार नाही. आढावा घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती आणि समाधानकारक मदत करणार' असंही यावेळ उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.