विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : भिवंडी (bhiwandi) शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाळ्यामध्ये इमारत कोसळण्याच्या घटनांचा इतिहास पाहता भिवंडीत शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एक धोकादायक दोन मजली इमारत कोसळली (Building collapses) आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार जणांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात भिवंडी अग्निशामक दलाला यश मिळाले आहे. दरम्यान यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिवंडी  शहरातील गौरीपाडा धोबी तलाव येथील साहिल हॉटेल परिसरात असलेली अब्दुल बारी जनाब इमारत ही 40 वर्षांहून जुनी आहे. इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना तर त्यावरील दोन मजली निवासी वापर केला जात आहे. शनिवारी मध्यरात्री या इमारतीच्या मागील बाजूचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावरील कुटुंब ढिगाऱ्या खाली दबले होते .स्थानिक नागरिकांसह भिवंडी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ढिगाऱ्या खालून एकूण सात जणांना बाहेर काढले.


त्यापैकी तस्निम कौसर मोमीन वय 8 महिने,उझ्मा अब्दुल लतिफ मोमीन वय 40 वर्षे या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अब्दुल लतिफ मोमीन वय 65 वर्ष,फरजान लतिफ मोमीन वय 50 वर्ष,बुशरा आतिफ मोमीन वय 32 वर्ष, अदीमा लतिफ मोमीन वय 7 वर्ष,उरूसा अतिफ मोमीन वय 3 वर्षे हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना नजीकच्या अल मोईन या खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अब्दुल लतिफ मोमीन यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. तर उरूसा अतिफ मोमीन या दोघी लहान मुली किरकोळ जखमी आहेत.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रात्री उशिरा पालिका आयुक्त अजय वैद्य दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत रुग्णालयात जाऊन जखमींचा विचारपूस केली आहे. ही इमारत धोकादायक होती का? धोकादायक होती तर काय कारवाई केली होती या बाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल अशी माहिती अजय वैद्य यांनी दिली.