धक्कादायक! इमारतीवरुन ढकलून मित्राची हत्या, पोलिसांना पाहून पळताना आणखी एकाचा मृत्यू
एकाच ठिकाणी दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे
पनवेल : पनवेलमध्ये आज एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना उडकीस आली आहे. एकाच ठिकाणी झालेल्या दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ मोबाईलसाठी सख्ख्या मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर याच ठिकाणी दुसऱ्या घटनेत पोलिसांना पाहून पळताना एकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
पनवेल भागात रहाणाऱ्या आदित्य शेकाटे या तरुणाने आपला मित्र प्रथमेश राणे याला अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीवरुन ढकलून देत त्याची हत्या केली. मृत प्रथमेश राणे (19) हा पनवेलच्या सावरकर चौकातील हरीओम अपार्टमेंटमध्ये तर त्याची हत्या करणारा आरोपी आदित्य शेकाटे (18) हा पनवेलमधील परदेशी आळीत रहाण्यास होता.
प्रथमेश आणि आदित्य हे दोघेही मित्र असून ते दोघे नशा करत होते. प्रथमेशकडे असलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि ब्लु टुथ स्पिकर आरोपी आदीत्यला हवा असल्याने त्याने प्रथमेशला नशा करण्याच्या बहाण्याने साईनगर परिसरातील एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत बोलावलं. आदित्यने प्रथमेश जवळचा मोबाइल आणि ब्लु टुथ स्पिकर जबरदस्तीने लुटल्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रथमेशने आरडाओरडा सुरु केल्याने घाबरेलल्या आदित्यने प्रथमेशला इमारतीवरुन ढकलून दिलं. यात प्रथमेशचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची घटनास्थळी धाव
प्रथमेश खाली पडताना मोठा आवाज झाल्याने त्या भागात रहाणाऱ्या काही नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता त्यांना प्रथमेश रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ पोहचत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आदित्यला ताब्यात घेतलं. पोलिसांनी आदित्यकडे चौकशी केली असता त्याने आदित्यला इमारतीवरून ढकलल्याची कबूली दिली.
एकाच ठिकाणी दुसरी घटना
घटनास्थळी पोलीस आले असतानाच इमारतीच्या दुसऱ्या बाजूला मद्यप्राशन करत बसलेले काही जण पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले. यातील एकाचा तोल गेल्याने तो पाण्याच्या टाकीत पडला. आणि यात त्याचा मृत्यू झाला.