मुंबई : मुंबईमधील एका कंज्यूमर कोर्टने उबर इंडियावर कडक कारवाई केलीये. यामागील कारण म्हणजे उबर इंडिया प्रवाशांना योग्य सेवा देण्यात अपयशी ठरली. यामुळे कंज्यूमर कोर्टने प्रवाशांना 20 हजार रुपये भरण्याचे आदेश दिलेत. मुख्य म्हणजे कॅबला उशीर झाल्यामुळे महिलेचं विमान चुकलं. कंज्यूमर कोर्टने प्रवाशांना उबरवर मानसिक ताण निर्माण केल्याबद्दल दहा हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी पैसे देण्यास सांगितलंय.


चार वर्षांपूर्वीचा खटला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीतील वकील कविता शर्मा 12 जून 2018 रोजी संध्याकाळी 05:50 वाजता मुंबईहून चेन्नईला जाणार होत्या. त्यांच्या घरापासून विमानतळ सुमारे 36 किमी अंतरावर होतं, म्हणून शर्मा यांनी दुपारी 3:29 च्या सुमारास छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी उबर बुक केली. बुकिंग केल्यानंतर शर्मा यांनी ड्रायव्हरशी संपर्क साधून अंदाजे वेळ जाणून घेतली. वारंवार फोन केल्यानंतर कॅब 14 मिनिटांनी पोहोचली.


तक्रारीप्रमाणे, ड्रायव्हरने फोन कॉलवर व्यस्त असल्याने राइड सुरू करण्यास उशीर केला. कॉल संपल्यानंतर काही मिनिटांनी ड्रायव्हरने राइड सुरू केली. शर्मा यांच्या दाव्यानुसार, एवढा उशीर होऊनही चालकाने पुन्हा उशीर केला आणि कारमध्ये सीएनजी भरला. त्यामुळे अजून 15 ते 20 मिनिटे उशीर झाला.


बुकिंग दरम्यान, Uber अॅपने कविता यांना विमानतळावर संध्याकाळी 5 वाजता पोहोचण्याची अंदाजे वेळ दाखवली. पण उशीर झाल्यामुळे शर्मा 05:23 च्या सुमारास विमानतळावर पोहोचल्या. परिणामी त्यांचं विमान चुकलं. याशिवाय उबरने त्यांना राईडचे 703 रुपये बिल दिलं. कॅबच्या बुकिंग दरम्यान अंदाजे भाडे फक्त 563 रुपये होते.


कंपनीला कायदेशीर नोटीस 


उबर चालकाच्या निष्काळजीपणामुळे फ्लाइट चुकली, असा आरोप कविता शर्मा यांनी आपल्या तक्रारीत केलाय. यानंतर त्याला पुढच्या फ्लाइटची तिकिटं विकत घ्यावी लागली. त्यांनी या प्रकरणाबाबत उबरकडे तक्रार केल्यावर कंपनीने 139 रुपयांचा रिफंड दिला. शर्मा यांनी कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवली मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.


न्यायालयाचा निर्णय कविता शर्मा यांच्या बाजूने


दरम्यान याविरोधात ठाणे जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे उबर इंडियाच्या विरोधात तक्रार दाखल केलीये. यानंतर अखेर कोर्टाने उबर इंडियाला कविता शर्माला 20 हजार रुपये देण्याचे आदेश दिले.